जिल्हा परिषद इमारतीच्या पाडकामाला सुरुवात
जिल्हा परिषद इमारतीच्या पाडकामाला सुरुवात
सात मजली अत्याधुनिक इमारत; ८७ कोटींच्या आराखड्याला अंतिम मंजुरी प्रलंबित
सकाळ वृत्तसेवा
अलिबाग, ता. १ : रायगड जिल्हा परिषदेची ऐतिहासिक ओळख असलेली ‘शिवतीर्थ’ ही जुनी इमारत पाडून त्या जागी सात मजली अत्याधुनिक नवी जिल्हा परिषद इमारत उभारण्यात येणार आहे. मागील तीन वर्ष विविध कारणांमुळे रखडलेल्या या कामाला लवकरच सुरुवात होणार असून सध्या जुनी इमारत पाडण्याचे काम सुरु झाले आहे. या प्रकल्पासाठी ८७ कोटी रुपयांच्या सुधारित आराखड्याला अंतिम तांत्रिक मंजुरी मिळणे बाकी असून, पहिल्या टप्प्यात ७७ कोटी ८३ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. पुण्यातील टी अँड टी विक्रम इन्फ्रा जेव्ही या कंपनीला या कामाचे कंत्राट देण्यात आले आहे.
जुनी इमारत धोकादायक ठरल्याने ती पाडण्यास मंजुरी मिळाली असून सध्या इमारतीवरील चौथा मजला काढण्याचे काम सुरू आहे. १९७८ साली रायगड जिल्हा परिषदेच्या इमारतीचे बांधकाम सुरू झाले होते. १९८२ मध्ये ‘शिवतीर्थ’ या नावाने ही इमारत पूर्ण झाली होती. तत्कालीन जिल्हा परिषद अध्यक्ष प्रभाकर पाटील यांच्या पुढाकारातून जिल्हा परिषदेचा कारभार एकाच इमारतीतून चालावा, यासाठी ही वास्तू उभारण्यात आली होती. जवळपास ३९ वर्षे या इमारतीतून जिल्हा परिषदेचा कारभार अव्याहतपणे सुरू होता.
स्ट्रक्चरल ऑडीटमध्ये धोकादायक
समुद्रालगत असल्याने खाऱ्या हवेचा परिणाम, कालांतराने इमारत जीर्ण झाल्यामुळे ती धोकादायक बनली होती. लोणेरे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठातील स्ट्रक्चरल अभियंता डॉ. सचिन पोरे यांनी इमारतीची पाहणी करून धोकादायक असल्याचा अंतरिम अहवाल प्रशासनाला सादर केला. त्यानंतर गेल्या वर्षी ऑगस्टपासून सुरक्षेच्या कारणास्तव ही इमारत बंद ठेवण्यात आली असून सर्व कार्यालये अन्यत्र स्थलांतरित करण्यात आली आहेत. सध्या जिल्हा परिषदेची विविध कार्यालये कुंटेबाग, पंचायत समिती कार्यालय व अन्य ठिकाणी विखुरलेली असल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
सर्व विभाग येणार एका छताखाली
नव्या इमारतीत तळमजल्यावर संपूर्ण पार्किंगची व्यवस्था असेल. त्यावर सात मजले असून जिल्हा परिषदेचे बांधकाम, पाणीपुरवठा, आरोग्य, शिक्षण, ग्रामपंचायत आदी सर्व विभाग एकाच छताखाली कार्यरत राहणार आहेत. सुमारे ५५० कर्मचाऱ्यांसाठी प्रशस्त कार्यालयीन जागा निर्माण केली जाणार असून अभियंत्यांसाठी स्वतंत्र कक्षांचे नियोजन करण्यात आले आहे. इमारतीची अंतर्गत सजावट आधुनिक शैलीत असली तरी जिल्ह्याचे ऐतिहासिक महत्त्व जपले जाईल, असा दावा प्रशासनाकडून करण्यात येत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

