नवी मुंबईत एकनिष्ठेला संधी

नवी मुंबईत एकनिष्ठेला संधी

Published on

वाशी, ता. १ (बातमीदार) : नवी मुंबई महापालिकेतील महापौर निवडीत वनमंत्री गणेश नाईक यांनी पुन्हा एकदा आपली राजकीय कौशल्य दाखवून दिले आहे. भाजपला एकहाती सत्ता मिळवून देण्यात निर्णायक भूमिका बजावणाऱ्या नाईकांनी महापौरपदासाठी सर्व चर्चित नावांना बाजूला सारत धक्कादायक निर्णय घेतला आहे. नेरूळलगतच्या कुकशेत गावातील नगरसेवक सूरज पाटील यांच्या पत्नी नगरसेविका सुजाता यांची महापौर उमेदवारीसाठी निवड करत नाईकांनी सर्वच राजकीय वर्तुळाला आश्चर्याचा धक्का दिला.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी थेट राजकीय संघर्ष करत नवी मुंबई महापालिकेत भाजपला स्पष्ट बहुमत मिळवून देण्यात गणेश नाईक यांची भूमिका महत्त्वाची ठरली. १११ जागांच्या महापालिकेत भाजपने ६५ जागा जिंकत बहुमताचा ५६ चा आकडा सहज पार केला, तर शिंदे गटाच्या शिवसेनेला ४२ जागांवर समाधान मानावे लागले. या विजयामागे नाईक यांचा आक्रमक प्रचार आणि स्थानिक नेतृत्वावर असलेली पकड कारणीभूत ठरली. भाजपच्या ६५ नगरसेवकांपैकी बहुसंख्य नगरसेवक हे नाईकांचे कट्टर समर्थक मानले जातात. त्यामुळे महापालिकेवर नाईक यांचे वर्चस्व अधिकच मजबूत झाले आहे.

महापौरपद महिलांसाठी राखीव झाल्याने अनेक नावांची चर्चा सुरू होती. नाईक यांचे पुतणे सागर नाईक यांचे नाव महापौरपदासाठी आघाडीवर होते; मात्र आरक्षणामुळे त्यांना या शर्यतीतून बाहेर पडावे लागले. त्यानंतर ज्येष्ठ नगरसेविका नेत्रा शिर्के, माजी महिला जिल्हाध्यक्ष माधुरी सुतार, रेखा म्हात्रे, तसेच तुर्भे येथील शुभांगी पाटील यांची नावे चर्चेत होती. मात्र, या सर्व अंदाजांना छेद देत नाईकांनी सूरज पाटील यांच्या पत्नी सुजाता यांची निवड करत निष्ठावान कार्यकर्त्याला बक्षीस दिल्याचा संदेश दिला आहे. सूरज पाटील हे गणेश नाईक यांचे विश्वासू सहकारी म्हणून ओळखले जातात.

यंदाच्या निवडणुकीत प्रभागाची रचना ग्रामीण आणि शहरी भागात विभागली गेली असतानाही सूरज आणि सुजाता पाटील या दाम्पत्याने दोन्ही भागांतून मोठ्या मताधिक्याने विजय मिळवला होता. सुजाता पाटील या २०१५ मध्ये पहिल्यांदा निवडून आल्या होत्या आणि यंदा सलग दुसऱ्यांदा त्यांनी यश मिळवले आहे. महापौरपदासाठी त्यांची निवड करत गणेश नाईक यांनी नव्या चेहऱ्याला संधी देतानाच ग्रामीण-शहरी समतोल साधल्याचेही स्पष्ट झाले आहे. या निर्णयामुळे नवी मुंबईच्या राजकारणात पुढील काळात नवे समीकरण तयार होणार असल्याची चर्चा रंगू लागली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com