लोकप्रियतेपेक्षा शाश्वत विकासावर भर

लोकप्रियतेपेक्षा शाश्वत विकासावर भर

Published on

लोकप्रियतेपेक्षा शाश्वत विकासावर भर
अमित साटम यांच्याकडून अर्थसंकल्पाचे कौतुक
मुंबई, ता. १ : अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पात लोकरंजक घोषणा न करता शाश्वत विकासावर लक्ष केंद्रित केले आहे. सात टक्के विकासदरासह कोरोनातून सर्वात जलद सावरणारी प्रमुख अर्थव्यवस्था म्हणून भारत उदयास आला आहे. लाखो लोकांना गरिबीतून बाहेर काढत देशभरातील राहणीमानाचा दर्जा सुधारण्याची मोठी किमया आपल्या अर्थव्यवस्थेने केली आहे, अशी प्रतिक्रिया भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांनी दिली.
केंद्रीय अर्थसंकल्पात तीन मुद्द्यांवर प्रामुख्याने भर दिला आहे. पायाभूत सुविधा आणि नवोन्मेषाद्वारे विकासाला गती देणे, तरुण उद्योजकांना सक्षम बनवणे आणि सर्वसमावेशक प्रगती सुनिश्चित करण्यासाठी ‘सबका साथ, सबका विकास’ हे स्वप्न पुढे नेणे. मुंबईच्या विकासाला चालना देण्यासाठी अर्थसंकल्पात सहा प्रमुख उपक्रमांची घोषणा करण्यात आल्याच्या मुद्द्यावरही साटम यांनी भाष्य केले.

टीबीएम आणि ‘पाताळ लोक’साठी सवलत
देशांतर्गत टनेल बोरिंग मशीन (टीबीएम) उत्पादकांना करसवलत दिल्याने मुंबईच्या महत्त्वाकांक्षी ७० किमी लांबीच्या भूमिगत बोगद्याच्या कामाला, अर्थात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संकल्पित केलेल्या ‘पाताळ लोक’ प्रकल्पाला थेट फायदा होईल. आयातीवरील अवलंबित्व कमी होऊन स्वदेशी उत्पादनाला प्रोत्साहन मिळेल. यामुळे प्रकल्पाचा खर्च कमी होईल तसेच मेट्रो प्रकल्पांना गती मिळेल, असे साटम यांनी नमूद केले.

मुंबई-पुणे हायस्पीड रेल कॉरिडॉर
मुंबई आणि पुणे ही राज्यातील उद्योग व आर्थिक विकासाची महत्त्वाची केंद्रे आहेत. हाय-स्पीड रेल कॉरिडॉरमुळे २५० ते ३२० किमी वेगाने रेल्वे धावतील. त्यामुळे दोन शहरांमधील प्रवासाचा वेळ कमी होईल आणि व्यवसायवृद्धीला चालना मिळेल. परिमाणी राज्याच्या अर्थव्यवस्थेवर व गुंतवणूक वाढण्यासाठी उपयोग होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

एमएसएमईंना सात लाख कोटींची तरलता
देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या सूक्ष्म-लघू-मध्यम (एमएसएमई) उद्योगांना अर्थसंकल्पात सात लाख कोटींच्या तरलतेचा फायदा होईल. या भरघोस निधीमुळे उद्योजकांना आधुनिकीकरण, कामकाजाचा विस्तार आणि मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण करण्यास मदत होईल, असे ते म्हणाले.

‘ऑरेंज इकॉनॉमी’ला चालना
मुंबईतील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजीला पाठिंबा देणे ही सर्जनशील उद्योगांमध्ये एक धोरणात्मक गुंतवणूक आहे. १५ हजार माध्यमिक शाळा आणि ५०० महाविद्यालयांमध्ये व्हिज्युअल इफेक्ट्स, गेमिंग आणि कॉमिक्स, कंटेंट क्रिएटर प्रयोगशाळा स्थापन होतील. जेन-झी तरुणाईला मीडिया, मनोरंजन आणि डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये करिअर करण्यासाठी सक्षम केले जाईल. यामुळे मुंबईला सर्जनशीलतेची राजधानी म्हणून जगाच्या नकाशावर स्थान मिळवण्याची संधी प्राप्त झाल्याचे साटम म्हणाले.

पालिकांना रोख्यांसाठी प्रोत्साहन
महापालिकांकडून उभारल्या जाणाऱ्या प्रत्येक एक हजार कोटींच्या रोख्यांना १०० कोटींचे प्रोत्साहन अनुदान दिले जाणार आहे. त्यामुळे शहरी पायाभूत सुविधांसाठी संसाधने उपलब्ध होतील. आशियातील सर्वात मोठ्या मुंबई महापालिकेसाठी ही मोठी संधी आहे. कॉर्पोरेट बाँड्सच्या तुलनेत यामध्ये गुंतवणूक बुडण्याची शक्यता कमी असते. या माध्यमातून जमलेला निधी रस्ते, पाणीपुरवठा, सांडपाणी व्यवस्था इत्यादी प्रकल्पांसाठी वापरला जाईल. त्यामुळे शहरांच्या विकासाला थेट हातभार लागेल, अशी माहिती साटम यांनी दिली.

महिला सक्षमीकरणासाठी शी-मार्ट
‘शी-मार्ट’च्या माध्यमातून निर्मिती महिला बचत गटांच्या उत्पादनांसाठी संघटित बाजारपेठ उपलब्ध होईल. ‘लखपती दीदी’नंतर महिलांना आत्मनिर्भर करण्यात ‘शी-मार्ट’ची मोठी मदत होईल. बचत गटांमध्ये अग्रेसर असल्याने ‘शी-मार्ट’चा सर्वाधिक लाभ महाराष्ट्राला मिळेल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com