धोरण कागदावर, रस्त्यावर गोंधळ
फेरीवाला धोरण कागदावर
कल्याण-डोंबिवलीतील स्थानक परिसर बकाल
डोंबिवली, ता. २ : कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात फेरीवाला पुनर्वसनाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार रेल्वे स्थानकपासून १५० मीटर परिसरात फेरीवाल्यांना सक्त मनाई असतानाही, प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे डोंबिवली स्थानक परिसराने बकाल रूप धारण केले आहे. धोरण केवळ कागदावरच मर्यादित राहिल्याने पादचारी आणि वाहनचालकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
अलीकडेच एका मराठी तरुणीला डोंबिवली रेल्वे स्थानक परिसरात व्यवसाय करण्यापासून पालिका प्रशासनाने रोखले होते; मात्र त्याच वेळी परिसरात अनेक परप्रांतीय फेरीवाले अनधिकृतपणे व्यवसाय करत असल्याचे समोर आले. या दुजाभावामुळे वादाला तोंड फुटले असून, मनसे नेते अविनाश जाधव यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. ‘‘नियम सर्वांना समान असावेत; मराठी माणसावर होणारा अन्याय खपवून घेतला जाणार नाही,’’ असा इशारा त्यांनी दिला आहे.
डोंबिवली पूर्व भागातील परिस्थिती अत्यंत गंभीर झाली आहे. अंडा भुर्जी, चायनीज आणि बिर्याणीच्या गाड्यांमुळे पदपथ गायब झाले आहेत. मद्यविक्रीच्या दुकानांजवळ रस्त्यावरच मद्यप्राशन करणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. यामुळे महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना प्रवास करणे असुरक्षित झाले आहे. तसेच दिवा, मुंब्रा आणि भिवंडीतून येणाऱ्या फेरीवाल्यांची मुजोरी वाढली असून, किरकोळ कारणावरून रुग्णवाहिका चालक आणि पादचाऱ्यांना मारहाण होण्याच्या घटना घडल्या आहेत.
दिखाऊ कारवाई
महापालिकेच्या अतिक्रमण विभागाची कारवाई केवळ ‘फार्स’ ठरत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. पालिका कर्मचारी आणि फेरीवाल्यांचे आर्थिक लागेबांधे असल्याचे व्हिडिओ यापूर्वीच व्हायरल झाले आहेत. डोंबिवली पूर्वेकडील ‘ग’ प्रभागात कारवाईचे प्रमाण अत्यंत कमी असल्याने फेरीवाल्यांनी रस्ते अक्षरशः हडपले आहेत.
नव्या महापौरांसमोर आव्हान
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत ३ फेब्रुवारी रोजी नवे महापौर आणि उपमहापौर पदभार स्वीकारणार आहेत. त्यानंतर होणाऱ्या पहिल्याच महासभेत फेरीवाल्यांचा हा प्रलंबित आणि जटिल प्रश्न गाजण्याची दाट शक्यता आहे. प्रशासन आता तरी ठोस पावले उचलणार की रस्ते कायमचे फेरीवाल्यांच्या ताब्यात जाणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

