“काही बोलायचे आहे; पण बोलणार नाही…”

“काही बोलायचे आहे; पण बोलणार नाही…”

Published on

केंद्रीय अर्थसंकल्पाचे मार्मिक विश्लेषण
डोंबिवलीत ४०व्या सलग व्याख्यानाचा विश्वविक्रम

डोंबिवली, ता. २ ः केंद्रीय अर्थसंकल्पात नेमके काय जाहीर झाले, यापेक्षा काय मुद्दाम टाळले गेले, याचा अर्थ अधिक बोलका असतो. संरक्षण आणि अनुदानासारख्या पारंपरिक विषयांपेक्षा नव्या आर्थिक प्रवाहांकडे सूचक इशारा देणारा हा एक संयत आणि सजग अर्थसंकल्प आहे, असे मत ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ चंद्रशेखर टिळक यांनी व्यक्त केले.

टिळकनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. विशेष म्हणजे, एकाच विषयावर एकाच वक्त्याने सलग ४० वर्षे भाष्य करण्याचा जागतिक विक्रम या व्याख्यानाच्या निमित्ताने प्रस्थापित झाला.
सेबीने दिलेल्या संकेतांनुसारच सरकारने ‘डेरिव्हेटिव्ह इन्स्ट्रुमेंट्स’वरील सिक्युरिटी ट्रान्झॅक्शन टॅक्स वाढवला आहे. याचा थेट फायदा केंद्र सरकारच्या तिजोरीला होणार असल्याचे टिळक यांनी स्पष्ट केले. अर्थसंकल्पातील घोषणांमधून भारतीयांचा कल आंतरराष्ट्रीय पर्यटनापेक्षा देशांतर्गत पर्यटनाकडे वाढल्याचे स्पष्ट होते. याचा सकारात्मक परिणाम व्यापार आणि परकीय चलनसाठ्यावर होईल. अनेक वर्षांनंतर अर्थसंकल्पात म्युनिसिपल बाँड्सचा उल्लेख झाला आहे. डोंबिवलीसारख्या शहरांसाठी नवे प्रकल्प साकारण्याची ही एक मोठी संधी असल्याचे त्यांनी नमूद केले.

जागतिक घडामोडींचे प्रतिबिंब
अमेरिकेने वाढवलेले टॅरिफ ही भारताच्या प्रगतीचीच एक प्रकारे पोचपावती आहे. येणाऱ्या काळात झिंक आणि तांबे यांसारख्या औद्योगिक धातू क्षेत्राला ‘अच्छे दिन’ येतील, असे सूतोवाचही त्यांनी केले.

४० वर्षांची अखंड परंपरा
गेली ३९ वर्षे सलग अर्थसंकल्पाचे विश्लेषण करणाऱ्या चंद्रशेखर टिळक यांनी यंदा ४०व्या वर्षात पदार्पण करत एक अनोखा विक्रम नोंदवला. ही परंपरा डोंबिवलीतच सुरू राहिली, हे शहराचे भाग्य असल्याचे या वेळी मान्यवरांनी सांगितले. या ऐतिहासिक कामगिरीबद्दल टिळकनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष सीए सचिन आंबेकर आणि भारत विकास परिषदेच्या ॲड. वृंदा कुलकर्णी यांच्या हस्ते टिळक यांचा विशेष सन्मान करण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com