आदिवासी युवकांसाठी सैन्यदलाचे दरवाजे खुले

आदिवासी युवकांसाठी सैन्यदलाचे दरवाजे खुले

Published on

आदिवासी युवकांसाठी सैन्यदलाचे दरवाजे खुले
‘अग्निवीर’ प्रशिक्षणाला शासनाची मंजुरी; विवेक पंडितांच्या पाठपुराव्याला यश

विरार, ता. २ (बातमीदार) : आदिवासी भागातील तरुणांना भारतीय सैन्यदलात भरती होण्याची संधी मिळावी, यासाठी आदिवासी विकास विभागाच्या आयुक्त लीना बनसोड यांनी महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. माजी आमदार तथा आदिवासी विकास आढावा समितीचे अध्यक्ष (मंत्री दर्जा) विवेक पंडित यांनी केलेल्या मागणीची दखल घेत, आयुक्तांनी आदिवासी युवकांसाठी ‘अग्निवीर भरतीपूर्व प्रशिक्षण’ सुरू करण्याबाबत सकारात्मक कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत. यामुळे दुर्गम भागातील आदिवासी तरुण-तरुणींचा देशसेवेचा मार्ग सुकर झाला आहे.
आदिवासी विकास विभागामार्फत सध्या पोलीस भरतीसाठी आदिवासी युवक-युवतींना विनामूल्य प्रशिक्षण दिले जाते. मात्र, सैन्यदलातील ‘अग्निवीर’ योजनेसाठी अशा प्रकारचे कोणतेही स्वतंत्र प्रशिक्षण उपलब्ध नव्हते. दुर्गम भागातील तरुणांकडे शारीरिक क्षमता असूनही केवळ योग्य मार्गदर्शना अभावी ते भरती प्रक्रियेत मागे पडत होते. ही बाब लक्षात घेऊन विवेक पंडित यांनी २३ डिसेंबर २०२५ रोजी पत्राद्वारे या प्रशिक्षणाची मागणी केली होती. आदिवासी विकास विभागाच्या आयुक्त लीना बनसोड यांनी या प्रस्तावावर कार्यवाही करत सचिवांना ई-मेलद्वारे सूचना केल्या आहेत. त्यानुसार ​विद्यमान पोलिस भरती प्रशिक्षण केंद्रांमध्येच अग्निवीर प्रशिक्षणाचा समावेश केला जाणार आहे. ​यात शारीरिक चाचणी, लेखी परीक्षा आणि वैद्यकीय निकषांबाबत सखोल मार्गदर्शन दिले जाईल. तज्ज्ञ प्रशिक्षकांकडून आदिवासी तरुणांना सैन्यदलातील शिस्त आणि तांत्रिक तयारीचे धडे दिले जातील.
------------------
चौकट
युवावर्गातून समाधान व्यक्त
ग्रामीण आणि अतिदुर्गम भागातील आदिवासी तरुणांमध्ये सैन्य सेवेबाबत मोठी ओढ आहे. आता शासकीय स्तरावर अधिकृत प्रशिक्षण सुरू झाल्यामुळे त्यांना खासगी शिकवण्यांवर अवलंबून रहावे लागणार नाही. विवेक पंडित यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे हा निर्णय मार्गी लागल्याने आदिवासी समाज आणि युवावर्गातून समाधान व्यक्त केले जात आहे.
=====================
आदिवासी युवकांमध्ये अफाट जिद्द आणि शारीरिक क्षमता आहे. त्यांना केवळ योग्य संधी आणि मार्गदर्शनाची गरज होती. ‘अग्निवीर’ प्रशिक्षणाच्या निर्णयामुळे देशाच्या संरक्षणात आता आदिवासी तरुणांचा सहभाग अधिक वाढेल.
- विवेक पंडित, अध्यक्ष, (मंत्री दर्जा) आदिवासी विकास आढावा समिती

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com