‘कलानी महल’चे पुन्हा सत्ताकेंद्र

‘कलानी महल’चे पुन्हा सत्ताकेंद्र
Published on

उल्हासनगर, ता. २ (वार्ताहर) : उल्हासनगरच्या राजकारणात सत्ता कुणाचीही असो, निर्णयांची दिशा आजही ‘कलानी महल’कडूनच ठरते, हे महापौरपदाच्या ताज्या घडामोडींमधून पुन्हा स्पष्ट झाले आहे. शिवसेनेच्या टीओके कोट्यातून अश्विनी निकम यांच्या नावावर शिक्कामोर्तब होताच शहरातील राजकीय सत्तेची नाडी पुन्हा ‘कलानी महल’कडे वळली आहे. महायुतीअंतर्गत हा निर्णय एकमताने झाल्याचे सांगितले जात असले, तरी त्यामागील राजकीय समीकरणे, शिवसेनेतील वाढती अस्वस्थता आणि भाजप आमदार कुमार आयलानी व कलानी गटातील जुने वैर यामुळे येत्या काळात उल्हासनगरचे राजकारण अधिकच तापणार असल्याचे संकेत मिळू लागले आहेत.
ज्योती कलानी या राष्ट्रवादीकडून आमदार, स्थायी समिती सभापती आणि महापौर राहिल्या, तर २०१८ मध्ये सून पंचम कलानी भाजपच्या पाठिंब्यावर महापौरपदी विराजमान झाल्या होत्या. आता माजी आमदार पप्पू कलानी यांचे कट्टर समर्थक अश्विनी निकम या महापौरपदी विराजमान होत असल्याने, शहरातील सत्तासमीकरणांवर कलानी कुटुंबाची पकड अजूनही मजबूत असल्याचे चित्र समोर आले आहे. टीम ओमी कलानी गटाचे प्रवक्ते कमलेश निकम यांच्या पत्नी असलेल्या आणि शिंदे गटाच्या कलानी कोट्यातून निवडून आलेल्या अश्विनी निकम यांच्या नावावर महायुतीची अधिकृत शिक्कामोर्तब होताच, उल्हासनगरच्या राजकारणात पुन्हा एकदा ‘कलानी महल’च्या भूमिकेवर चर्चा सुरू झाली आहे. महापालिकेतील महत्त्वाचे निर्णय, पदांची वाटणी आणि भविष्यातील सत्तासंघर्ष यांचा केंद्रबिंदू पुन्हा कॅम्प क्रमांक २ ठरणार, अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे.


तीन दशकांची सत्ता परंपरा
कॅम्प क्रमांक २ मधील खेमाणी परिसरातील ‘कलानी महल’ हे केवळ निवासस्थान नसून, उल्हासनगरच्या राजकारणाचे पारंपरिक सत्ताकेंद्र मानले जाते. तीन दशकांपासून उमेदवार निवड, आघाड्यांची जुळवाजुळव आणि सत्तेची गणिते याच ठिकाणाहून ठरत असल्याची राजकीय प्रतिमा आहे. काँग्रेसकडून नगराध्यक्ष व आमदार, तुरुंगात असतानाही सलग दोन वेळा आमदारकी, त्यानंतर रिपाइं (आठवले)च्या माध्यमातून विधानसभेत पुनरागमन असा पप्पू कलानी यांचा वादग्रस्त पण प्रभावी राजकीय प्रवास राहिला. नऊ वर्षांचा तुरुंगवास भोगूनही राजकीय पकड कायम ठेवणाऱ्या या घराण्याची सत्ता परंपरा अधोरेखित करणारी ठरली आहे.


कलानी-आयलानी संघर्ष
भाजपचे आमदार कुमार आयलानी यांनी पप्पू कलानी यांना पराभूत करत सत्तासमीकरण बदलले. त्यानंतर ज्योती कलानी यांनी आयलानी यांचा पराभव केला. नंतरच्या काळात कुमार आयलानी यांनी पुन्हा झेप घेत आमदारकी मिळवली. २०१८ मध्ये पंचम कलानी यांची महापौरपदी निवड, हे संघर्षाचे टप्पे ठरले. आता महापौरपद कलानी गटाशी जवळीक असलेल्या अश्विनी निकम यांच्याकडे, तर उपमहापौरपद भाजपकडे जाणार असल्याने, हे जुने वैर पुन्हा नव्या धारदार वळणावर जाण्याची चिन्हे दिसत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com