नवी मुंबई देणार पाच शहरांना स्वच्छतेचे धडे

नवी मुंबई देणार पाच शहरांना स्वच्छतेचे धडे

Published on

नवी मुंबई देणार राज्यातील शहरांना स्वच्छतेचे धडे

लोणार, केज, मलकापूर, जिंतूर आणि कन्नड शहराची निवड

सकाळ वृत्तसेवा

नवी मुंबई, ता. २ : स्वच्छ भारत मिशनअंतर्गत होणाऱ्या स्वच्छता सर्वेक्षण या स्पर्धेचे नियम बदलले आहेत. या वर्षीपासून स्वच्छ भारत मिशनतर्फे ‘स्वच्छ शहर जोडी’ उपक्रम सुरू करण्यात आले आहे. त्याअंतर्गत नवी मुंबई राज्यातील पाच शहरांना स्वच्छतेबाबत मार्गदर्शन करणार आहे. नवी मुंबई महापालिका सलग सातपेक्षा अधिक वेळा महाराष्ट्रात पहिला क्रमांक, तर गेल्यावर्षी नवी मुंबईला विभागून पहिला क्रमांक देण्यात आला आहे.

स्वच्छ भारत मिशनअंतर्गत दरवर्षी नवी मुंबई शहराचा राज्यातून पहिला क्रमांक येतो. स्वच्छतेबाबत नवी मुंबई शहराने देशातील सर्वच शहरांपुढे आदर्श ठेवला आहे. देशातील इतर शहरांनाही प्रेरणा मिळावी, याकरिता पुरस्कार विजेत्या शहरांना आता मार्गदर्शकाच्या भूमिकेत आणण्याचे काम केंद्र सरकारने केले आहे. कृती आराखड्यात नमूद बाबींच्या अनुषंगाने स्वच्छ सर्वेक्षणामध्ये केवळ गुणांकनाकरिता नाही, तर केलेल्या कामाचे आपल्याला संपूर्ण समाधान मिळेल, अशाप्रकारे नियमित स्वच्छता कामे हाती घ्यावीत व स्वच्छता निरीक्षक, पर्यवेक्षक यांच्यापासून ते उच्च अधिकाऱ्यांपर्यंत प्रत्येकाची जबाबदारी निश्चित करून द्यावी, असे निर्देश आयुक्तांनी दिले. याविषयी माहितीपुस्तिका तयार करून ती प्रत्येक घटकाला उपलब्ध करून द्यावी, असेही त्यांनी सूचित केले.
--------

महापालिकेचे पाच अधिकारी नेमणार

या वर्षीपासून स्वच्छ भारत मिशनच्या वतीने ‘स्वच्छ शहर जोडी’ उपक्रमांतर्गत देशातील १९६ शहरांना मार्गदर्शन करण्यासाठी एकूण ७२ मार्गदर्शक शहरांची निवड करण्यात आली आहे. त्यामध्ये ‘सुपर स्वच्छ लीग’मध्ये समाविष्ट नवी मुंबई महापालिका शहरास महाराष्ट्र राज्यातील लोणार, केज, मलकापूर, जिंतूर, कन्नड या पाच नगर परिषदा स्वच्छ शहर जोडीमध्ये देण्यात आलेल्या आहेत. या स्वच्छ शहर जोडी असलेल्या पाच शहरांकरिता नवी मुंबई महापालिकेचे पाच नोडल अधिकारी नेमण्यात येणार आहेत. या अधिकाऱ्यांनी आगामी दोन महिन्यांत या शहरांना प्रत्यक्ष भेट देऊन त्यांना स्वच्छतेतील प्रगतीबाबत मार्गदर्शन करावे, अशा सूचना आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी केल्या आहेत. त्यानंतर स्वत: आयुक्त, अतिरिक्त आयुक्त व उच्चस्तरीय अधिकारी या शहरांना भेटी देतील, असेही आयुक्तांमार्फत सूचित करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com