पोलिस पथकावर जीवघेणा हल्ला
पोलिस पथकावर जीवघेणा हल्ला
सहाय्यक पोलिस निरीक्षकासह चौघे गंभीर जखमी; हल्लेखोर फरार
नवी मुंबई, ता. २ (वार्ताहर) : अमली पदार्थांच्या तस्करीत सहभागी असलेल्या आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या मानखुर्द पोलिसांच्या पथकावर गुन्हेगारांनी टोळक्याने हॉकी स्टिक, तलवार, चॉपर आणि गावठी कट्ट्याने प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना शनिवारी मध्यरात्री उलवे येथील शगुन चौकात घडली आहे. या हल्ल्यात सहाय्यक पोलिस निरीक्षकासह चार जण गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेनंतर उलवे पोलिसांनी हल्लेखोरांविरोधात गुन्हा दाखल करून त्यांचा शोध सुरू केला आहे.
मानखुर्द पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या एका अमली पदार्थाशी संबंधित (एनडीपीएस) गुन्ह्यातील आरोपी उलवे येथे असल्याची माहिती मानखुर्द पोलिसांना खबऱ्यामार्फत मिळाली होती. या माहितीच्या आधारे सहाय्यक पोलिस निरीक्षक किरण मांढरे आणि त्यांच्या पथकाने खबऱ्याने दिलेल्या माहितीच्या आधारे गत शनिवारी मध्यरात्री उलवेतील शगुन चौकात सापळा लावला होता. या वेळी मुख्य आरोपी इस्माईल शेख आणि शाहीद खान हे तेथील एका हॉटेलमध्ये जेवण करीत असताना, पोलिसांच्या पथकाने त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला; मात्र या वेळी आयाज खान, आसिफ खान, मेराज खान, निजाम, शोएब आणि मेहराज या आरोपींनी बेकायदा जमाव जमवून हातामध्ये हॉकी स्टिक, तलवार, चॉपर आणि गावठी कट्टे घेऊन पोलिस पथकावर प्राणघातक हल्ला चढवला. या हल्ल्यात किरण मांढरे (सहाय्यक पोलिस निरीक्षक), अतुल जयस्वाल (पोलिस मित्र), अहमदरजा कुरेशी, फिरोज सिद्दीकी हे चौघे गंभीर जखमी झाले. आरोपी फरार असून, त्यांच्या शोधासाठी विशेष पथके रवाना करण्यात आली आहेत, अशी माहिती उलवे पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अर्जुन रजाणे यांनी दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

