भाजपाच्या गटनेतेपदी गणेश खणकर
भाजपच्या गटनेतेपदी गणेश खणकर
शिवसेनेकडून अमेय घोले यांची नियुक्ती
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २ ः मुंबई महापालिकेत भाजपच्या गटनेतेपदी गणेश खणकर, तर शिवसेनेच्या गटनेतेपदी अमेय घोले यांची नियुक्ती करण्यात आली आहे. भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम, तर शिवसेनेचे नेते राहुल शेवाळे यांनी त्यांच्या नावाची आज घोषणा केली. त्यामुळे मुंबईच्या महापौरपदाच्या निवडणुकीला वेग येण्याची शक्यता आहे.
काँग्रेस, शिवसेना (ठाकरे), मनसे, एमआयएम यांनी आपल्या पक्षाचे गटनेते जाहीर केल्यानंतर भाजप आणि शिवसेना शिंदे गट कधी गटनेते जाहीर करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. आज भाजप, शिवसेनेने (शिंदे) गटनेते जाहीर केले. या वेळी सहपालकमंत्री मंगलप्रभात लोढा, भाजपचे माजी खासदार मनोज कोटक, आमदार पराग अळवणी आणि भाजपचे सर्व नवनिर्वाचित नगरसेवक उपस्थित होते. पालिका निवडणुकीनंतर प्रत्येक पक्षाला संख्याबळानुसार गटनेता नियुक्त करणे आवश्यक असते. त्यानुसार नोंदणी करण्यात आली आहे.
पालिका मुख्यालयात माध्यमांशी बोलताना अमित साटम म्हणाले, की राज्यातील महायुती सरकारमध्ये भाजप, शिवसेना (शिंदे) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) हे तिन्ही पक्ष एकत्र आहेत. निवडणुकीदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांच्याशी जागावाटपाबाबत व्यक्ती म्हणून आमचा विरोध होता, पक्ष म्हणून नव्हता. आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (अजित पवार) तीन नगरसेवक शिवसेनेसोबत गट नोंदणी करणार असून, राष्ट्रवादी काँग्रेस हा महायुतीचा घटक पक्ष असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. भाजपच्या गटनेतेपदी गणेश खणकर यांची निवड ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, भाजपची मुंबई निवडणूक समिती तसेच पक्षातील सर्व वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करून करण्यात आली असल्याचे साटम यांनी सांगितले.
...
आमचे बहुमत स्पष्ट!
मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत भाजप आणि शिवसेना (शिंदे) यांच्या महायुतीला एकूण ११८ जागा मिळाल्या असून, बहुमतासाठी आवश्यक असलेल्या ११४ जागांपेक्षा चार जागा अधिक असल्याचे त्यांनी नमूद केले. ‘आमचे बहुमत स्पष्ट आहे. आता मुंबईकरांच्या विकासाची बेरीज जुळवायची आहे,’ असे ते म्हणाले. तसेच, स्पष्ट बहुमत असल्याने कोणत्याही पक्षाच्या पाठिंब्याची गरज नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. मुंबईचा महापौर हा महायुतीच्या ११८ नगरसेवकांपैकीच एक नगरसेविका असेल; मात्र महापौरपदाच्या उमेदवाराचे नाव जाहीर करण्याचे साटम यांनी टाळले. ‘महापौर कोण होणार हे महत्त्वाचे नाही. महापालिकेला भ्रष्टाचारविरोधी प्रशासन मिळणे, मुंबईचा विकास, सुरक्षितता आणि मुंबईकरांचे स्वप्न साकार होणे हेच खरे महत्त्वाचे आहे,’ असे त्यांनी सांगितले.
...
शिवसेनेचे स्वतंत्र गटनेते
शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाचे नगरसेवक अमेय घोले यांची गटनेते म्हणून शिवसेनेचे चिटणीस राहुल शेवाळे यांनी नियुक्ती केली आहे. पालिकेत स्वतंत्र गटनेते म्हणून पक्षाची नोंद केली आहे.
...
महायुतीचा महापौर
विविध पक्षांच्या गटनेत्यांची नियुक्ती झाल्यानंतर आता वेध लागले आहेत ते मुंबईचा महापौर कोण असेल, याचे. भाजप-शिवसेना महायुतीचा महापौर नियुक्त होणार, हे आता निश्चित झाले असून मराठी महापौर करून शिवसेना ठाकरे पक्षाला धक्का देण्याचा प्रयत्न भाजप करणार असल्याचे समजते.
...
शिवसेना (शिंदे) पक्षात आमच्या पक्षाचे नगरसेवक जाणार, ही चर्चा चुकीची आहे. मुंबई महापालिकेत निवडून आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या नगरसेवकांचा आमचा स्वतंत्र गट म्हणून नोंदणी करणार आहोत. राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) पक्षाच्या नगरसेवकाबाबत काही माहिती नाही.
- सना मलिक, आमदार, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्ष
...
गणेश खणकर लढावू व्यक्तिमत्त्व
गणेश खणकर हे दहिसर प्रभाग क्रमांक सातमधून मुंबई महापालिका निवडणूक जिंकले आहेत. भाजप मुंबईचे महामंत्री म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी आता विविध निवडणुकांमध्ये प्रचार यंत्रणा उभी करणे आणि ती यशस्वीपणे राबविणे, हे काम निष्ठेने केले आहे. विविध राज्यांमध्ये जाऊन त्यांनी निवडणुकांचे काम केले आहे. दहिसरमध्ये शिवसेना ठाकरे पक्षाचे माजी आमदार विनोद घोसाळकर यांचे पुत्र सौरभ घोसाळकर यांचा त्यांनी पराभव केला. भाजपच्या गटनेतेपदी त्यांची नियुक्ती झाली आहे. पक्षाच्या संघटना उभारणीत त्यांचा मोलाचा वाटा आहे. मुंबई आणि उपनगरांतील टँकर माफियांविरोधात दिलेला प्रखर लढा ही खणकर यांची ओळख आहे. टँकर माफियाकडून होणारी पाण्याची लूट थांबवण्यासाठी त्यांनी अनेक आंदोलने केली आणि जनजागृती केली.
...
अमेय घोले शिंदे यांचे विश्वासू
अमेय घोले हे वडाळा येथून ते तीन वेळा नगरसेवक म्हणून निवडून आले आहेत. ते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विश्वासू आहेत. त्यामुळे त्यांच्यावर गटनेतेपदाची जबाबदारी सोपविली आहे. घोले हे शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांचे निकटवर्ती होते, तसेच युवा सेनेचे कोषाध्यक्ष होते. वडाळा येथील श्रद्धा जाधव आणि इतर पदाधिकाऱ्यांमध्ये मतभेद झाल्यानंतर त्यांनी युवा सेनेचा राजीनामा देऊन शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. ते मुंबई महापालिकेच्या आरोग्य समितीचे अध्यक्ष होते. वडाळा विभागात त्यांचा जनसंपर्क चांगला आहे. त्यामुळे जनतेने त्यांना तीन वेळा निवडून दिले आहे.
...
कोकण भवन येथे नोंदणी
बेलापूर (बातमीदार) ः काँग्रेस, शिवसेना (ठाकरे गट), मनसे आणि इतर पक्षांनी महापालिका निवडणुकांचा निकाल जाहीर झाल्यानंतर काही दिवसांतच कोकण आयुक्तांकडे गट नोंदणी पूर्ण केली होती. भाजप आणि शिंदे सेनेची नोंदणी मागील गुरुवारी होणार होती; मात्र माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर राज्यात जाहीर झालेल्या तीन दिवसांच्या दुखवट्यामुळे ही प्रक्रिया पुढे ढकलण्यात आली होती. अखेर सोमवारी (ता. २) भाजप आणि शिवसेनेने बेलापूर येथील कोकण भवन येथे आपली गट नोंदणी पूर्ण केली आहे. ही नोंदणी करताना दोन्ही पक्षांनी आपली स्वतंत्र गट म्हणून नोंदणी केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

