नेरूळचे तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक निलंबित

नेरूळचे तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक निलंबित

Published on

नेरूळचे तत्कालीन वरिष्ठ पोलिस निरीक्षक निलंबित
आरोपीला मदत व कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका
नवी मुंबई, ता. २ (वार्ताहर) : कर्तव्यात गंभीर कसूर, वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशांचे उल्लंघन आणि आर्थिक फसवणुकीच्या गुन्ह्यातील सराईत आरोपीला जामीन मिळवून देण्यासाठी अप्रत्यक्ष मदत केल्याचे गंभीर आरोप सिद्ध झाल्याने नेरूळ पोलिस ठाण्याचे तत्कालीन वरिष्ठ पोलिस निरीक्षक ब्रह्मानंद रावसाहेब नाईकवाडी यांना पोलिससेवेतून निलंबित करण्यात आले आहे. नवी मुंबईचे पोलिस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी ही कठोर कारवाई केली असून, त्यामुळे पोलिस दलात एकच खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, युनुस कासम खोत यांनी उर्मेश उदाणी यांच्याविरोधात भूखंड व्यवहारात आर्थिक फसवणूक केल्याची तक्रार ४ सप्टेंबर २०२५ रोजी नेरूळ पोलिस ठाण्यात दाखल केली होती; मात्र या तक्रारीची सखोल चौकशी न करता वरिष्ठ पोलिस निरीक्षक नाईकवाडी यांनी ती थेट ११ ऑक्टोबर २०२५ रोजी दप्तरी दाखल करून बंद केली. यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी हस्तक्षेप करीत नव्याने चौकशीचे आदेश दिले. पोलिस निरीक्षक (गुन्हे) यांनी केलेल्या चौकशीत उदाणी यांनी फसवणूक केल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर २५ नोव्हेंबर २०२५ रोजी पोलिस उपआयुक्तांनी गुन्हा दाखल करण्याची लेखी परवानगी दिली. तरीही वरिष्ठांचे आदेश असूनसुद्धा नाईकवाडी यांनी जाणीवपूर्वक गुन्हा दाखल करण्यात दिरंगाई केली. या विलंबाचा फायदा घेत आरोपी उदाणी यांनी न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला. विशेष म्हणजे, सुनावणीवेळी नाईकवाडी स्वतः न्यायालयात हजर राहिले नाहीत. तसेच आरोपीच्या जामिनाला विरोध करणाऱ्या अर्जावर त्यांनी स्वतः स्वाक्षरी न करता दुय्यम अधिकाऱ्याची स्वाक्षरी घेतली. आरोपीची गुन्हेगारी पार्श्वभूमी नमूद न केल्याने त्याला जामीन मिळण्यास मदत झाली. पोलिस आयुक्तांनी नाईकवाडी यांची कृती ‘अशोभनीय, बेजबाबदार आणि पोलिस दलाची प्रतिमा मलीन करणारी’ असल्याचे नमूद केले आहे. १२ जानेवारी २०११च्या अधिसूचनेनुसार व महाराष्ट्र पोलिस अधिनियम १९५१च्या कलम २५(२) अंतर्गत त्यांना निलंबित करण्यात आले आहे. विभागीय चौकशी पूर्ण होईपर्यंत नाईकवाडी निलंबित राहणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com