शिक्षणात एआयचा प्रभावी वापर काळाची गरज
शिक्षणात एआयचा प्रभावी वापर काळाची गरज
मुंबईतील विविध शाळांतील शिक्षकांचा कार्यशाळेत उत्स्फूर्त सहभाग
मुंबई, ता. ३ ः शिक्षण क्षेत्रात तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर वाढविण्याच्या उद्देशाने युनायटेड एज्युकेशन फाउंडेशन (युईएफ) आणि मौलाना आझाद नॅशनल उर्दू युनिव्हर्सिटी, हैदराबाद (मानू) यांच्या संयुक्त विद्यमाने अंधेरी येथील मेयर हॉलमध्ये एक दिवसीय कार्यशाळा उत्साहात पार पडली. ‘एआयच्या युगात शिक्षणाचे महत्त्व आणि त्यासाठी आवश्यक मानसिक तयारी’ या विषयावर आधारित या कार्यशाळेत मुंबईतील विविध शाळांमधील शिक्षकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला.
तंत्रज्ञान आणि मानवी मूल्यांचा संगम साधणाऱ्या या कार्यशाळेत शिक्षणात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) वापर ही काळाची गरज असल्याचे मान्यवरांनी आपल्या भाषणांतून अधोरेखित केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला युईएफचे सचिव सैयद हबीबुद्दीन यांनी उपस्थित पाहुण्यांचे स्वागत केले.
मुख्य वक्ते राशिद खान यांनी आपल्या भाषणात तंत्रज्ञान आणि मानवी मूल्यांमधील संतुलनावर भर दिला. “एआयच्या युगात केवळ बौद्धिक विकास नव्हे, तर मनाचा आणि हृदयाचाही विकास तितकाच महत्त्वाचा आहे,” असे त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमाचे मुख्य अतिथी म्हणून उपस्थित असलेले महापालिकेच्या शिक्षण विभागाचे उपशिक्षणाधिकारी निसार खान यांनी शिक्षकांना आधुनिक कौशल्ये आत्मसात करण्याचे आवाहन केले. तसेच जमात-ए-इस्लामी हिंद, मुंबईचे सचिव उबैदुर्रहमान यांनी विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शिक्षकांनी तंत्रज्ञानाशी मैत्री करणे आवश्यक असल्याचे सांगितले.
तज्ज्ञांकडून एआय टूल्सचे मार्गदर्शन
मानू विद्यापीठाच्या अनुभवी शिक्षणतज्ज्ञांनी विविध सत्रांद्वारे शिक्षकांना एआयविषयक प्रशिक्षण दिले. सीपीडीएमटीचे संचालक प्रा. समी सिद्दीकी यांनी मूलभूत एआय टूल्स आणि डिजिटल संसाधनांची माहिती दिली. डॉ. वसीम यांनी एआयच्या मदतीने वर्ग अधिक विद्यार्थी-केंद्रित व आनंददायी कसा बनवता येईल, याचे प्रात्यक्षिक सादर केले. प्रा. सैयद अमान यांनी प्रशासन, मूल्यमापन आणि निकाल तपासणी प्रक्रियेत एआयमुळे कामाचा ताण कसा कमी होऊ शकतो, यावर प्रकाश टाकला.
शिक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
या कार्यशाळेला सहभागी शिक्षकांनी ‘अत्यंत उपयुक्त’ अशी प्रतिक्रिया दिली. एआयमुळे वेळेची बचत होऊन अध्यापनातील सर्जनशीलता वाढण्यास मदत होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. कार्यक्रमाच्या शेवटी मान्यवरांच्या हस्ते सर्व सहभागींना प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

