दुबार भातशेतीची लगबग

दुबार भातशेतीची लगबग

Published on

दुबार भातशेतीची लगबग
राजनाला कालव्याच्या पाण्यामुळे कर्जत तालुक्यात हिरवळ

कैलास म्हामले : सकाळ वृत्तसेवा
कर्जत, ता. ३ : राजनाला कालव्याच्या पाण्यामुळे कर्जत तालुक्यात दुबार भातशेतीची लगबग सुरू झाली असून, शेतशिवार पुन्हा हिरवळीने नटू लागले आहे. ४५ गावांतील सुमारे २,५४२ हेक्टर शेतीला या कालव्याद्वारे सिंचनाचा आधार मिळत असल्याने शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
भिवपुरी येथील टाटा पॉवर जलविद्युत प्रकल्पातून वर्षभर होणाऱ्या पाण्याच्या विसर्गामुळे पेज नदीला बारमाही प्रवाह मिळतो. ही नदी भिवपुरीतून नेरळपर्यंत वाहत पुढे उल्हास नदीला मिळते. या नैसर्गिक पाण्याचा उपयोग करून शेतीला ओलावा मिळावा, दुबार पीक घेता यावे, या उद्देशाने महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा (पाटबंधारे) विभागाने राजनाला कालवा प्रकल्प कार्यान्वित केला आहे.
जलसंपदा विभागाने अलीकडे केलेल्या कालवा दुरुस्ती व देखभाल कामांमुळे अनेक वर्षांपासून पाण्यापासून वंचित राहिलेल्या भागांपर्यंतही पाणी पोहोचले आहे. परिणामी, रखडलेली शेती पुन्हा सुरू झाली असून, भातशेतीसह भाजीपाला व कडधान्य पिकांची लागवड वाढताना दिसत आहे. पाटबंधारे उपविभाग, कर्जत यांनी केलेल्या नियोजनबद्ध कामामुळे शेतीसोबतच फार्महाऊस व शिवारही बहरले आहे.
१९५९ मध्ये सुरू झालेला राजनाला प्रकल्प वैजनाथ, कडाव, गौरकामथ, तांबस सालोख, वदप आदींसह तालुक्यातील ४५ गावांमध्ये पसरलेला आहे. डावा, उजवा व पाली पोटल असे तीन कालवे या प्रकल्पांतर्गत कार्यरत आहेत. दरवर्षी साधारण डिसेंबर महिन्यात कालव्यातून पाणी सोडले जाते, तर पावसाळा सुरू होताच कालवे बंद केले जातात. या नियोजनामुळे उन्हाळ्यातही भातासारखे पीक घेणे शक्य झाले आहे. साधारण जानेवारीपासून दुबार शेतीची कामे सुरू होऊन मे महिन्यापर्यंत कापणीपर्यंतचा कालावधी गाठला जातो.
दरम्यान, कर्जत तालुक्यातील शेतकऱ्यांना आणखी दिलासा देण्यासाठी पेज नदीचे पाणी चील्हर नदीत सोडण्याची मागणी पुढे आली आहे. चील्हर नदी परिसरातील ग्रामस्थांनी ही मागणी जोर धरत मांडली असून, पाणी सोडल्यास कशेले परिसरातील वाड्या-वस्त्यांमधील पाणीटंचाई दूर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यामुळे अधिक क्षेत्र ओलिताखाली येऊन शेतीसाठी अनुकूल परिस्थिती निर्माण होईल, असा शेतकऱ्यांचा विश्वास आहे.

पावसाळ्यानंतरही हिरवळ टिकून
राजनाला कालव्यामुळे केवळ शेतीच नव्हे, तर संपूर्ण परिसराचा चेहरामोहरा बदलत आहे. पावसाळ्यानंतरही तालुक्यात हिरवळ टिकून राहत आहे. वाढलेली हिरवळ, पाण्याची उपलब्धता आणि निसर्गसौंदर्यामुळे फार्महाउस व रिसॉर्टची संख्या वाढली असून, पर्यटकांची वर्दळही वाढताना दिसते. पर्यावरणाचा समतोल राखत विकासाला चालना देणारा हा कालवा ठरत आहे.

फोटो - 529

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com