विरोधी पक्ष नेतेपदावर खलबते
विरोधी पक्षनेतेपदावर खलबते
राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांचा दावा; लवकरच चित्र होणार स्पष्ट
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ३ ः महापौर निवडीनंतर ठाणे महापालिकेत विरोधी पक्षनेत्याच्या खुर्चीवर कोण बसणार, यावरून खलबते सुरू झाली आहेत. तांत्रिकदृष्ट्या तिसरा मोठा पक्ष असलेल्या राष्ट्रवादी शरद पवार गटाचा विरोधी पक्षनेता बसेल, असा कयास बांधला जात होता; मात्र आता एमआयएमच्या पाठिंब्यावर राष्ट्रवादी अजित पवार गटही विरोधी पक्षनेतेपदावर दावा ठोकण्याच्या तयारीत आहे. यासंदर्भात २८ जानेवारीलाच दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा झाली होती, असा गौप्यस्फोट नजीब मुल्ला यांनी केला आहे. एमआयएमसोबत जायचे की राष्ट्रवादी शरद पवार गटाशी जुळवून घ्यायचे, हे दोन्ही पर्याय आपल्याकडे असून दोन दिवसांत चित्र स्पष्ट होईल, अशी माहिती त्यांनी दिली आहे.
राज्यातील महायुतीचा घटकपक्ष असलेल्या राष्ट्रवादी अजित पवार गटाने ठाणे महापालिका निवडणुकीत स्वतंत्र लढत दिली होती. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड यांना शह देण्यासाठी ही खेळी मानली जात होती. ही खेळी यशस्वीही ठरली असून कळवा-मुंब्य्रात आव्हाडांना धक्का देण्यात आला आहे. त्यामुळे गेल्या निवडणुकीत ३४ नगरसेवक निवडून आणणाऱ्या आव्हाडांना राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या १२ नगरसेवकांवर समाधान मानावे लागले आहे. शहरासह मुंब्य्रात राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आठ नगरसेवक निवडून आले आहेत; मात्र या गुरू- शिष्याच्या या लढाईत मुंब्र्यात एमआयएमने मुसंडी मारत आपले पाच नगरसेवक महापालिकेत पाठवले आहेत. महापालिकेत महायुतीचे महापौर, उपमहापौर बसतील, हे निकालाच्या दिवशीच स्पष्ट झाले; मात्र प्रबळ विरोधी पक्षासाठी आवश्यक असणारे संख्याबळ विस्कळित झाले आहे.
राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र येणार, अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू होती. त्यामुळे ठाण्यातही हे मनोमिलन होईल, अशी शक्यता वर्तवली जात होती. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यानंतर विरोधी पक्षनेतेपदाचा मार्ग अधिक सुकर होणार होता. विरोधी पक्ष आणि स्थायी समिती ही दोन्ही पदे वाटून सत्ताधाऱ्यांवर अंकुश ठेवण्यात येणार होता; पण उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान दुर्घटनेत निधन झाल्यानंतर या विलीनीकरणावरून सध्या राजकारण तापले आहे. याची झळ ठाण्यातही पोहचेल, असे वाटत होते; पण पवार यांच्या अस्थिदर्शनाला आलेल्या गुरू-शिष्याने एकमेकांना गळाभेट दिल्याने मनोमिलनाच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या आहेत. असे असले तरी किमान विरोधी पक्षनेतेपद हाती राहावे, यासाठी दोन्हींकडून प्रयत्न सुरू असल्याचे दिसते.
पर्याय खुले
विरोधी पक्षनेता राष्ट्रवादी अजित पवार गटाचाच होणार, असा ठाम विश्वास नजीब मुल्ला यांनी व्यक्त केला आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटासोबत जायचे की एमआयएमसोबत गट स्थापन करायचा हे दोन्ही पर्याय आमच्याकडे खुले आहेत. यासंदर्भात दिवंगत अजित पवार यांच्यासोबतही चर्चा झाली होती, असे नजीब मुल्ला यांनी सांगितले; पण महापौर निवड होईपर्यंत निर्णय जाहीर करायचा नव्हता. आता उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याशी चर्चा करून दोन दिवसांत चित्र स्पष्ट करण्यात येईल, असे मुल्ला यांनी सांगितले.
तांत्रिक अभ्यासाचा सल्ला
संख्याबळाचा विचार केला असता तर राष्ट्रवादी शरद पवार गटाकडे १२ नगरसेवक आणि ठाकरे गटाचा एक अशी १३ नगरसेवकांची संख्या आहे. म्हणजे विरोधी पक्षनेते पदापासून ते स्थायी समिती सदस्य, स्वीकृत नगरसेवक बनवण्यासाठी आवश्यक असलेली संख्या आहे. पालिकेतील तिसरा मोठा पक्ष आहे. त्यामुळे राष्ट्रवादी अजित पवार गट सोबत आला तर ताकद वाढेल, असे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे शहराध्यक्षा मनोज प्रधान यांनी सांगितले; मात्र यासंदर्भातील निर्णय हे वरिष्ठ पातळीवर होणार असल्याचेही ते म्हणाले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

