दालने अपूर्ण, स्वच्छतागृहे बकाल

दालने अपूर्ण, स्वच्छतागृहे बकाल

Published on

दालने अपूर्ण, स्वच्छतागृहे बकाल
पहिल्याच दिवशी प्रशासनाचा भोंगळ कारभार
डोंबिवली, ता. ३ : सात वर्षांच्या प्रतीक्षेनंतर कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत लोकशाहीचे पुनरागमन झाले खरे, पण महापौर व उपमहापौरांच्या पदभार स्वीकारण्याच्या पहिल्याच दिवशी पालिका प्रशासनाच्या नियोजनशून्य कारभाराचे धिंडवडे निघाले. भव्य सोहळ्याचे आयोजन झाले असताना मूलभूत सुविधांच्या बाबतीत प्रशासन सपशेल अपयशी ठरल्याचे चित्र पाहायला मिळाले.

नवनिर्वाचित महापौर आणि उपमहापौरांच्या स्वागतासाठी पालिका मुख्यालय सजले असले तरी, त्यांची दालने मात्र अपूर्णच होती. महापौरांचे दालन घाईघाईत तात्पुरते तयार केले गेले, तर उपमहापौरांच्या दालनाचे काम पदभार स्वीकारण्याच्या दिवशीही सुरूच होते. धक्कादायक बाब म्हणजे, महिला महापौरांच्या दालनालगत असलेल्या महिला स्वच्छतागृहाची अवस्था अत्यंत बकाल असून, तिथे पाय ठेवण्याचीही सोय नाही. पालिकेत महिला नगरसेविकांची संख्या लक्षणीय असतानाही प्रशासनाची ही निष्काळजी चर्चेचा विषय ठरला.

सभागृहाबाहेर बसवण्यात आलेली अग्निशमन यंत्रणा केवळ शोभेची वस्तू ठरली आहे. येथील अग्निशामक सिलिंडरची मुदत ऑगस्ट २०२५ मध्येच संपली असून, प्रशासनाने ती बदलण्याची तसदीही घेतलेली नाही. लोकप्रतिनिधी आणि नागरिकांच्या गर्दीने गजबजलेल्या इमारतीत सुरक्षेबाबत असा हलगर्जी करणे मोठ्या दुर्घटनेला निमंत्रण देणारे आहे.

विद्यार्थ्यांचे हाल
स्वागत सोहळ्यासाठी मोहने येथील शाळेतील विद्यार्थ्यांना लेझीम सादरीकरणासाठी आणण्यात आले होते. मात्र, या लहान मुलांना तब्बल तीन तास कडक उन्हात मुख्यालयाबाहेरील फुटपाथवर बसवून ठेवण्यात आले. त्यांच्या नाश्त्याची किंवा पाण्याची साधी व्यवस्थाही प्रशासनाने केली नाही. अखेर परिस्थिती पाहून शिवसेनेच्या एका पदाधिकाऱ्याने पुढाकार घेऊन या विद्यार्थ्यांना नाश्ता उपलब्ध करून दिला. एकीकडे फटाक्यांच्या आतषबाजीत जल्लोष सुरू असतानाच, दुसरीकडे प्रशासनाच्या या ढिसाळ नियोजनामुळे ‘प्रशासकीय राजवटी’त नक्की काय काम झाले, असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com