रंगमंचावरून निसर्ग संरक्षणाचे आवाहन
रंगमंचावरून निसर्ग संरक्षणाचे आवाहन
काळा घोडा महोत्सवात १००हून अधिक विद्यार्थ्यांचा सहभाग
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ३ : काळा घोडा कला महोत्सवात पालिका शाळांमधील विद्यार्थ्यांनी इंग्रजी म्युझिकल ‘द व्हिस्परिंग वूड्स: ईशान्स जर्नी’ सादर करून पर्यावरण संवर्धनाचा प्रभावी संदेश दिला. १० ते १३ वयोगटातील १००हून अधिक विद्यार्थ्यांनी या नाट्यप्रयोगात सहभाग घेतला.
या म्युझिकल शोमधून जंगल, शहरी जीवन आणि मानवी दैनंदिन सवयी यांमधील परस्परसंबंध उलगडण्यात आला असून, छोट्या कृतींमधूनही निसर्गाचे संरक्षण शक्य असल्याचा विचार मांडण्यात आला आहे. निसर्गाकडे केवळ प्रेक्षक म्हणून न पाहता त्याच्या जतनाची जबाबदारी स्वीकारण्याचे आवाहन विद्यार्थ्यांनी रंगमंचावरून केले.
हा नाट्यप्रयोग ‘पहले अक्षर फाउंडेशन’च्या वर्षभर चालणाऱ्या थिएटर-आधारित शिक्षण उपक्रमाचा भाग आहे. या उपक्रमातून विद्यार्थ्यांचे स्पोकन इंग्रजी, संवादकौशल्य, आत्मविश्वास आणि सर्जनशीलता विकसित करण्यावर भर देण्यात येतो. अभिनय, कथा सांगणे, संगीत आणि हालचाली यांच्या माध्यमातून इंग्रजी भाषा शिकवण्याची ही प्रक्रिया वर्गखोलीबाहेर रंगमंचावर प्रत्यक्ष सादरीकरणातून राबवण्यात आली.
थिएटर-आधारित शिक्षणामुळे विद्यार्थ्यांची शब्दसंपत्ती वाढते, उच्चार सुधारतात आणि स्वतःला मोकळेपणाने व्यक्त करण्याचा आत्मविश्वास निर्माण होतो, जो त्यांच्या शैक्षणिक आणि भविष्यातील आयुष्यासाठी उपयुक्त ठरतो.
या उपक्रमाअंतर्गत विद्यार्थ्यांना सेट डिझाइन, दिग्दर्शन आणि अभिनय क्षेत्रातील व्यावसायिक कलाकारांसोबत काम करण्याची संधी मिळाली. त्यामुळे रंगमंचामागील प्रक्रिया, शिस्त आणि टीमवर्क यांचा प्रत्यक्ष अनुभव त्यांना घेता आला.
नरियलवाडी शाळेतील इयत्ता पाचवीचा विद्यार्थी शौर्य याने सांगितले की, रंगमंचावर अभिनय केल्यामुळे त्याचा आत्मविश्वास वाढला असून, हा अनुभव त्याच्यासाठी नवा आणि प्रेरणादायी ठरला आहे. गेल्या वर्षीच्या सादरीकरणात निसर्ग प्राण्यांच्या दृष्टिकोनातून मांडण्यात आला होता, तर यंदाच्या म्युझिकलमध्ये मानवी हस्तक्षेप, शहरीकरणाचे परिणाम आणि निसर्गाशी पुन्हा नातं जोडण्याची गरज अधोरेखित करण्यात आली आहे. ही रंगमंचीय प्रस्तुती काळा घोडा कला महोत्सवातील प्रेक्षकांसाठी खुली होती.
मुलुंडच्या कलाकारांची अनोखी कलाकृती
कलाकाराच्या मनातील सर्जनशील प्रवासाचे प्रभावी रूप मांडणारी अनोखी कलाकृती मुलुंड येथील श्री रविशंकर शाळेच्या विद्यार्थ्यांनी सादर केली आहे. या कलाकृतीत मेंदूला कलाकाराच्या मनाचे प्रतीक मानत सर्जनशीलता आणि भावनांचे केंद्र म्हणून दाखवण्यात आले आहे. विविध कला माध्यमांद्वारे कलाकाराच्या विचाराची आणि अभिव्यक्तीची रूपे साकारली असून, रोलर कोस्टरच्या ट्रॅक्सप्रमाणे हा प्रवास चढ-उतारांनी भरलेला असल्याचे दर्शवले आहे. हे पाहण्यासाठी तरुणाईंनी मोठी गर्दी केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

