अनधिकृत मोबाईल टॉवर हटवा

अनधिकृत मोबाईल टॉवर हटवा

Published on

कल्याण पूर्वेतील अनधिकृत मोबाईल टॉवर हटवा
शिवशक्ती नगरमधील रहिवाशांचा इशारा
कल्याण, ता. ३ (बातमीदार) : कल्याण पूर्व येथील नेतीवली, शिवशक्ती नगर परिसरात एका हॉटेलच्या मागील जागेत बेकायदा मोबाईल टॉवर उभारण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या अनधिकृत टॉवरमुळे परिसरातील कच्च्या घरांना आणि नागरिकांच्या जिवाला धोका निर्माण झाला असून, स्थानिकांनी कल्याण-डोंबिवली महापालिका आणि कोळसेवाडी पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली आहे.

शिवशक्ती नगर येथील एका हॉटेलच्या मागे २० ते ३० फूट उंचीचा मोबाईल टॉवर उभारण्यात आला आहे. रहिवाशांच्या दाव्यानुसार टॉवर उभारताना कोणतीही तांत्रिक सुरक्षा मानके पाळली गेलेली नाहीत. तसेच महापालिकेची कोणतीही रीतसर परवानगी न घेता हे बांधकाम करण्यात आले आहे. टॉवरच्या सभोवताली झोपडीवजा कच्ची घरे आहेत. वादळी वारे किंवा अतिवृष्टीमुळे हा टॉवर कोसळल्यास मोठी जीवितहानी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दाटीवाटीच्या वस्तीत टॉवरच्या लहरींमुळे आरोग्यावर घातक परिणाम होण्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे.

आंदोलनाचा पवित्रा
गंभीर प्रकाराबाबत रहिवाशांनी एकत्र येत महापालिका प्रशासनाला निवेदन दिले आहे. ‘‘हा टॉवर तत्काळ हटवण्यात यावा, अन्यथा भविष्यात घडणाऱ्या कोणत्याही दुर्घटनेला प्रशासन जबाबदार असेल,’’ असा इशारा रहिवाशांनी दिला आहे. तसेच, याप्रकरणी प्रशासन आणि पोलिसांनी तातडीने दखल न घेतल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय परिवर्तन पक्षाच्या वतीने देण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com