केडीएमसी महासभेत पहिल्याच दिवशी वादळ

केडीएमसी महासभेत पहिल्याच दिवशी वादळ

Published on

केडीएमसीची पहिलीच महासभा वादळी
नगरसेवकांचा प्रशासनावर हल्लाबोल
डोंबिवली, ता. ३ : कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या महापौर व उपमहापौर निवडीसाठी आयोजित विशेष महासभेत पहिल्याच दिवशी जोरदार गदारोळ पाहायला मिळाला. सत्ताधारी-विरोधी पक्षांमधील शाब्दिक युद्ध आणि लोकप्रतिनिधी विरुद्ध प्रशासन असा संघर्ष यामुळे सभागृह चांगलेच तापले होते. महापौर निवडीनंतरच्या भाषणादरम्यान शिवसेना (शिंदे गट) नगरसेवक मल्लेश शेट्टी आणि अतिरिक्त आयुक्त योगेश गोडसे यांच्यात तीव्र शाब्दिक चकमक झाली. तुम्हाला सभागृहात बोलण्याचा अधिकार नाही, बोलू नका नाहीतर बाहेर पडा, अशा कडक शब्दांत शेट्टी यांनी अधिकाऱ्यांना सुनावले. प्रशासनातील अधिकाऱ्यांना ‘माज’ आल्याचा थेट आरोप करत त्यांनी आपली आक्रमकता दाखवली, ज्यामुळे सभागृहात काही काळ तणाव निर्माण झाला होता.

कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या महापौर, उपमहापौर निवडीनंतरच्या भाषणादरम्यान अतिरिक्त आयुक्त योगेश गोडसे आणि नगरसेवक मल्लेश शेट्टी यांच्यात जोरदार शाब्दिक वाद झाला. या वादामुळे महासभेत काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले. पहिल्याच दिवशी महासभा चांगलीच गाजली. दरम्यान, पदनिवडीच्या महासभेत सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील नगरसेवकांमध्ये टोलवाटोलवीही पाहायला मिळाली. आपल्या हजरजबाबीपणासाठी ओळखले जाणारे शिंदे गटाचे नगरसेवक सचिन पोटे यांनी शिवसेना ठाकरे गटाच्या नगरसेवकांना खोचक टोला लगावला.

सभागृहातील गदारोळात शिवसेना शिंदे गटाचे नगरसेवक सचिन पोटे यांनी आपल्या मिश्कील शैलीत ठाकरे गटावर निशाणा साधला. ठाकरे गटाचे ११ नगरसेवक निवडून आले असताना सभागृहात मात्र केवळ ७-८ नगरसेवक हजर असल्याचे पाहून पोटे म्हणाले,‘‘तुम्ही निवडून आलात तेव्हा तुमची क्रिकेटची टीम होती; मात्र सभागृहात येईपर्यंत ती कबड्डीची झाली. पोटे यांच्या या विधानाने सभागृहात एकच हशा पिकला. सचिन पोटे यांनी भाजपमध्ये गेलेले आपले मित्र दीपेश म्हात्रे यांनाही सोडले नाही. उपमहापौरपदासाठी राहुल दामले यांचे नाव जाहीर होताच, मला वाटले होते दीपेश म्हात्रे उपमहापौर होतील, असे म्हणत त्यांनी म्हात्रेंची फिरकी घेतली.

आगामी महासभा तापणार?
पहिल्याच दिवशी प्रशासन आणि राजकीय नेत्यांमधील संघर्ष तसेच सत्ताधारी-विरोधकांमधील ही टोलवाटोलवी पाहता, आगामी काळात महापालिकेतील राजकारण अधिक आक्रमक होणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com