उज्ज्वला लाभार्थ्यांची पायपीट

उज्ज्वला लाभार्थ्यांची पायपीट

Published on

उज्ज्वला लाभार्थ्यांची पायपीट
सवलतींना कात्री लागल्याने पुन्हा चुलीचा आधार
संदीप साळवे ः सकाळ वृत्तसेवा
जव्हार, ता. ३ ः तालुक्यात उज्ज्वला गॅस योजनेच्या सवलतींना कात्री लागल्याचे चित्र आहे. त्यामुळे महागाईच्या काळात स्वयंपाकासाठी पुन्हा सरपणासाठी जंगलांमध्ये पायपीट करण्याची वेळ लाभार्थ्यांवर आली आहे.
केंद्र शासनाच्या उज्ज्वला गॅस योजनेचे जव्हार तालुक्यातील १३ हजार महिला उज्ज्वला योजनेच्या लाभार्थी झाल्या असल्याची माहिती जव्हार तहसील कार्यालयातील पुरवठा विभागातून देण्यात आली. स्वयंपाकासाठीचा गॅस घराघरांत पोहोचला. महिलांना धुरापासून मुक्ती मिळेल, असा दावा केंद्र सरकारच्या माध्यमातून करण्यात आला, पण जव्हार तालुक्यातील ग्रामीण भागात हा दावा फोल ठरल्याचे चित्र आहे. केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजनेअंतर्गत मोफत कनेक्शन मिळालेल्या हजारो कुटुंबे चुलीकडे वळाले आहेत. एकीकडे सिलिंडरचे दर गगनाला भिडले असताना दुसरीकडे शासनाकडून मिळणाऱ्या सवलती बंद झाल्याने गरीब महिलांना पुन्हा सरपणासाठी जंगलांमध्ये जाण्याची वेळ आली आहे.
-------------------------------
स्वतंत्र दररचनेची मागणी
- गॅसच्या वाढत्या किमतींमुळे गरीब कुटुंबांचे बजेटच कोलमडले नाही, तर महिलांच्या आरोग्याचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. धुरामुळे डोळ्यांचे विकार, दमा यांसारख्या आजारांना महिलांना सामोरे जावे लागत आहे.
- प्रशासनाने उज्ज्वला लाभार्थ्यांसाठी गॅस दरांमध्ये विशेष कपात करावी किंवा त्यांना स्वतंत्र सवलतीची दररचना लागू करावी, अशी आग्रही मागणी आता जव्हार तालुक्यातून होत आहे. सरकारने गॅस दिला, पण चालू ठेवण्याची ताकद आमच्यात नाही, अशी उद्विग्न प्रतिक्रिया लाभार्थी देत आहेत.
----------------------------
लाकूडफाट्यासाठी धावपळ
जव्हार तालुक्यात दुर्गम अशा आदिवासी गावखेड्यात सध्या विदारक चित्र आहे. एकेकाळी उज्ज्वला योजनेची ओळख असलेल्या शेगड्या आणि सिलिंडर आता घरांच्या कोपऱ्यात धूळखात पडले आहेत. अनेक घरांमध्ये सिलिंडर रिकामेच आहेत. गॅस संपला की तो पुन्हा भरण्यासाठी लागणारे पैसे नसल्याने महिला माळरानावर किंवा जंगलात लाकूडफाटा गोळा करण्यासाठी पायपीट करताना दिसत आहेत. यामुळे महिलांचे कष्ट तर वाढलेच आहे, पण पर्यावरणाच्या दृष्टीने ही बाब चिंतेची ठरत आहे.
---------------------------------
उज्ज्वला गॅस योजना ग्रामीण, दुर्गम भागातील महिलांना खूपच लाभदायक आहे. या योजनेमुळे पर्यावरणाचे रक्षण, स्वयंपाक करणाऱ्या महिलेला धुरापासून मुक्ती मिळत आहे. त्यामुळे सरकारने योजना नियमित चालू ठेवण्यासाठी आवश्यक प्रयत्न करावेत.
- संगीता जाधव, लाभार्थी
---------------------
पर्यटनदृष्ट्या परिपूर्ण असलेल्या जव्हार तालुक्यात मोठ्या प्रमाणात वनसंपत्ती आहे. उज्ज्वला गॅस योजनेमुळे वनाचे रक्षण होत आहे. त्यामुळे दुर्गम भाग म्हणून जव्हारला विशेष दर्जा देत ही योजना नियमित सुरू ठेवणे गरजेचे आहे.
- मनीषा वाणी, माजी नगरसेवक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com