मेंदूतील जखमेवर यशस्वी शस्त्रक्रिया

मेंदूतील जखमेवर यशस्वी शस्त्रक्रिया

Published on

मेंदूतील जखमेवर यशस्वी शस्त्रक्रिया
वृद्ध महिला पूर्णपणे बरी

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ३ : मधुमेहाशी झुंज देत असलेल्या ५८ वर्षांच्या एका महिलेचे आयुष्य अचानक अत्यंत कठीण झाले. तिचा स्वतःच्या शरीरावरील ताबा सुटला. हात, पाय आणि चेहऱ्यावर तीव्र आणि अनियंत्रित झटके सुरू झाले. झटके इतके तीव्र होते की वारंवार स्वतःच्याच पायाला दुखापत होत होती. सुरुवातीला हा साधा हालचालींचा विकार असल्याचे वाटले; मात्र तपासणीत मेंदूमध्ये तांदळाच्या दाण्याएवढी जखम (अल्सर) असल्याचे निष्पन्न झाले. या जखमेवर वेळेवर शस्त्रक्रिया करण्यात आल्यामुळे आता ही महिला पूर्णपणे बरी झाली आहे.
घाटकोपर येथे राहणाऱ्या राधा काळे यांना अचानक शरीराच्या उजव्या बाजूवर ताबा राहिला नाही. वारंवार होणाऱ्या झटक्यांमुळे त्यांच्या पायाला गंभीर जखमा झाल्या आणि त्यातून संसर्ग वाढत गेला. प्रकृती अधिकच बिघडल्याने त्यांना मुलुंडच्या फोर्टिस रुग्णालयातील अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले. काही काळ व्हेंटिलेटरचा आधार द्यावा लागला. मात्र, झटके सुरूच असल्याने व्हेंटिलेटर काढणे शक्य होत नव्हते. ट्रॅकिओस्टॉमी करूनही परिस्थितीत अपेक्षित सुधारणा झाली नाही. सखोल तपासणीनंतर राधा काळे यांना ‘हेमिबॅलिझम कोरिया’ हा अतिशय दुर्मिळ मेंदूविकार असल्याचे निदान झाले. दीर्घकाळ मधुमेह योग्यरीत्या नियंत्रणात नसल्यामुळे ‘डायबेटिक स्ट्रायटोपॅथी’ ही मेंदूशी संबंधित गुंतागुंत निर्माण झाली होती आणि त्यातूनच ही जखम तयार झाली होती. उपचार परिणामकारक ठरत नसल्याने रुग्णालयातील स्टिरिओटॅक्टिक आणि फंक्शनल न्यूरोसायन्सेस विभागातील वरिष्ठ न्यूरोसर्जन डॉ. गुरनीत सिंह सॉनी यांनी ‘पॅलिडोथॅलॅमिक ट्रॅक्टोटॉमी’ ही अत्यंत शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. रेडिओफ्रिक्वेन्सी तंत्रज्ञानाच्या सहाय्याने हालचाली नियंत्रित करणाऱ्या मेंदूतील विशिष्ट भागावर ही शस्त्रक्रिया करण्यात आली. शस्त्रक्रियेनंतर काही वेळातच झटके थांबले आणि राधा काळे यांची प्रकृती झपाट्याने सुधारू लागली. योग्य निदान, वेळेवर घेतलेला निर्णय आणि अचूक शस्त्रक्रियेच्या जोरावर राधा काळे यांना पुन्हा सामान्य आयुष्य जगण्याची संधी मिळाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com