शहापूर तालुक्यातील ९७ गावांसाठी ग्रीड पाणीपुरवठा योजना
शहापूर तालुक्यातील ९७ गावांसाठी ग्रीड पाणीपुरवठा योजना
भावली धरणाच्या सिंचन विमोचकावर जलजोडणीची सुरेश म्हात्रे यांची मागणी
शहापूर, ता. ३ (वार्ताहर) : जलजीवन मिशन कार्यक्रमांतर्गत टंचाईग्रस्त शहापूर तालुक्यातील ९७ गावांसाठी ग्रीड पाणीपुरवठा योजनेचे बांधकाम सुरू असून, भावली धरणाच्या सिंचन विमोचकावर जलवाहिनी जोडण्यास परवानगी देण्याची मागणी खासदार सुरेश म्हात्रे यांनी केली आहे. या मागणीसाठी मंगळवारी (ता. ३) म्हात्रे यांचे चिरंजीव सुमीत यांनी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची भेट घेतली.
शहापूर तालुक्यातील ९७ गावांसाठी इगतपुरी तालुक्यातील भावली धरणावर ग्रीड पाणीपुरवठा योजनेचे काम महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत सुरू आहे. योजनेकरिता भावली धरणातून पाणी आरक्षण मंजूर आहे. यानुसार धरणाच्या आऊटलेटमधून पाणीपुरवठा योजनेसाठी प्रस्तावित असलेली जलजोडणी आवश्यक आहे. मात्र, सद्यःस्थितीत या योजनेतील कामे ठिकठिकाणी सुरू असून, त्यानुसार ७५ टक्के कामे पूर्ण झालेली आहेत. जलसंपदा विभागाने जुलै २०२५ मध्ये महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या मुख्य अभियंत्यांना कळवून जलवाहिनी जोडण्यास नकार दिला होता. याऐवजी धरणामध्ये विहीर बांधून पाणी उपसा करावा, असे कळविले होते. त्यानुसार पंपिंग करून पाणी घ्यावे लागणार आहे. असे केल्यास या योजनेच्या देखभाल दुरुस्ती खर्चात मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे. यामुळे भविष्यात ही योजना बंद पडू शकते, अशी शंका म्हात्रे यांनी उपस्थित केली आहे.
यासाठी भावली धरणाच्या सिंचन विमोचकावर जलवाहिनी जोडणीस परवानगी द्यावी या मागणीसाठी याआधीदेखील म्हात्रे यांनी जुलै २०२५ मध्ये राधाकृष्ण विखे पाटील यांची भेट घेतली होती. या अनुषंगाने जलसंपदा मंत्र्यांनी मुख्य अभियंत्यांना वस्तुस्थिती तपासून माहिती सादर करण्याच्या सूचना दिल्या होत्या. मात्र, जलसंपदा विभागाने वीजनिर्मितीसंदर्भात ज्या प्रवर्तकासोबत करारनामा केला आहे. तो करारनामा होऊन वर्षे उलटलेली असतानादेखील भावली धरणालगत पॉवरहाउस कार्यान्वित करण्यात आलेला नाही, असे सांगितले. त्यामुळे पाणीपुरवठा योजनेकरिता जलजोडणी दिली तरी भविष्यात पॉवर हाउसकरिता आवश्यक पाण्याचा विसर्ग कमी होणार नाही. म्हणून ही योजना गुरुत्वाकर्षणाने चालवण्याकरिता भावली धरणाच्या सिंचन विमोचकावर टॅपिंग मिळणे अत्याआवश्यक असल्याची मागणी म्हात्रे यांनी केली आहे.
खर्च टाळण्यासाठी टॅपिंग आवश्यक
शहापूर तालुक्यातील आदिवासीबहुल क्षेत्रात पाण्याअभावी होत असलेली समस्या कायमची दूर करण्यासाठी ही योजना कारणीभूत ठरण्याची येथील टंचाईग्रस्तांना अपेक्षा आहे. म्हात्रे यांनी पुढाकार घेऊन विनाकारण होणाऱ्या खर्चाचा अपव्यय टाळण्यासाठी व भविष्यात दैनंदिन देखभाल दुरुस्तीत कमी खर्च येण्यासाठी भावली धरणाच्या सिंचन विमोचकावर शहापुरातील गावांच्या पाणीपुरवठा योजनेकरिता टॅपिंग देण्याबाबत जलसंपदाच्या प्रधान सचिवांना आदेशित करण्याची मागणी उचलून धरली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

