ठाणे महापौरपदी शर्मिला पिंपळोलकर बिनविरोध
ठाणे महापौरपदी शर्मिला पिंपळोलकर बिनविरोध
उपमहापौरपदी भाजपचे कृष्णा पाटील
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ३ : ठाणे महापालिकेवरील गेल्या चार वर्षांची प्रशासकीय राजवट अखेर मंगळवारी संपुष्टात आली. ठाणे महापालिकेच्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात आयोजित विशेष सर्वसाधारण सभेत शिवसेना शिंदे गटाच्या शर्मिला पिंपळोलकर यांची महापौरपदी, तर भाजपचे कृष्णा पाटील यांची उपमहापौरपदी बिनविरोध निवड झाली. यामुळे महापालिकेचा कारभार पुन्हा एकदा लोकप्रतिनिधींच्या हाती आला आहे.
३ फेब्रुवारी रोजी झालेल्या या सभेत जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी पीठासीन अधिकारी म्हणून काम पाहिले, तर मनीष जोशी यांनी सचिव म्हणून जबाबदारी पार पाडली. भगवे फेटे आणि पक्षांची उपरणे परिधान केलेल्या शिवसेना शिंदे गट व भाजपच्या नगरसेवकांच्या उपस्थितीमुळे चार वर्षांनंतर सभागृह पुन्हा गजबजले होते. महापौरपदासाठी शर्मिला पिंपळोलकर आणि उपमहापौरपदासाठी कृष्णा पाटील यांचा प्रत्येकी एकमेव अर्ज आल्याने पीठासीन अधिकाऱ्यांनी दोघांची बिनविरोध निवड जाहीर केली.
महापालिका निवडणुकीनंतर ठाण्याचा महापौर कोण होणार, याबाबत राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले होते. मात्र, ३० जानेवारी रोजी उमेदवारी अर्ज दाखल झाल्यानंतर चित्र स्पष्ट झाले. मंगळवारी झालेल्या विशेष सभेत या निवडीवर अधिकृत शिक्कामोर्तब झाले. त्यानंतर मुख्यालयाबाहेर उभारलेल्या व्यासपीठावर नवनिर्वाचित महापौर व उपमहापौरांनी उपस्थितांच्या शुभेच्छांचा स्वीकार केला.
----
महापौरांनी खुर्चीत बसणे टाळले
महापौरपदाची अधिकृत घोषणा झाल्यानंतर महापौर दालनात शर्मिला पिंपळोलकर यांनी खुर्ची स्वीकारणे अपेक्षित होते. मात्र, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे जिल्हा परिषद निवडणुकीच्या दौऱ्यावर असल्याने त्यांनी त्या दिवशी महापौर खुर्चीत बसणे टाळले.
----
धर्मवीरांचा बालेकिल्ला अबाधित ठेवण्याचे काम उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे. त्यामुळेच महापालिकेवर पुन्हा एकदा भगवा फडकला. त्यांनी दाखविलेल्या विश्वासास पात्र ठरण्याचा प्रामाणिक प्रयत्न करेन.
-शर्मिला पिंपळोलकर, महापौर, ठाणे
------
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी दिलेल्या विश्वासास साजेसे काम करणार. घनकचरा, पार्किंग, वाहतूक कोंडीसारख्या प्रश्नांवर ठोस उपाययोजना केल्या जातील.
-कृष्णा पाटील, उपमहापौर, ठाणे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

