पनवेल भाजपमध्ये अंतर्गत संघर्ष तीव्र

पनवेल भाजपमध्ये अंतर्गत संघर्ष तीव्र

Published on

पनवेल भाजपमध्ये अंतर्गत संघर्ष तीव्र
आमदार प्रशांत ठाकूर-विक्रांत पाटील वादाने वातावरण तापले
पनवेल, ता. ३ ( बातमीदार) : पनवेल तालुक्यात भारतीय जनता पक्षातील अंतर्गत मतभेद आता उघडपणे समोर आले असून, आमदार प्रशांत ठाकूर आणि विधान परिषदेचे राज्यपाल नियुक्त सदस्य आमदार विक्रांत पाटील यांच्यातील सुप्त संघर्षाने गंभीर वळण घेतले आहे. आतापर्यंत पक्षांतर्गत चर्चांपुरते मर्यादित असलेले मतभेद आता जाहीर आरोप-प्रत्यारोपांमध्ये रूपांतरित झाले असून, यामुळे पनवेलमधील भाजपचे राजकारण ढवळून निघाले आहे.

आमदार प्रशांत ठाकूर यांनी थेट आरोप करताना सांगितले की, आमदार विक्रांत पाटील हे विरोधी पक्षातील कार्यकर्त्यांना, विशेषतः शेतकरी कामगार पक्षाच्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना अप्रत्यक्षपणे बळ देत आहेत. त्यामुळे भाजपच्या निष्ठावान कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. “भाजपचा आमदार असूनही भाजपच्या कार्यकर्त्यांना डावलून विरोधी पक्षाच्या लोकांना मदत करणे ही भूमिका पक्षहिताची नाही,” असा स्पष्ट इशारा प्रशांत ठाकूर यांनी दिला.

या संपूर्ण प्रकरणामुळे भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता वाढली असून, अनेक ठिकाणी नाराजी उघडपणे व्यक्त होत आहे. काही पदाधिकाऱ्यांनी पक्ष नेतृत्वाकडे तक्रारी केल्याचीही चर्चा आहे. “आमदार विक्रांत पाटील यांना वारंवार समजावून सांगण्यात आले, सूचना देण्यात आल्या; मात्र त्यांची भूमिका बदललेली दिसत नाही,” असा दावा प्रशांत ठाकूर यांनी केला. या पार्श्वभूमीवर आमदार प्रशांत ठाकूर यांनी आक्रमक पवित्रा घेत भाजपच्या कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना थेट आश्वासन दिले आहे. “यापुढे आमदार विक्रांत पाटील यांनी जेव्हा जेव्हा भाजपविरोधी भूमिका घेतली, तेव्हा मी स्वतः उघडपणे त्याला विरोध करणार आहे. भाजपच्या कार्यकर्त्यांच्या हितासाठी मी कोणतीही तडजोड करणार नाही,” अशी ठाम भूमिका त्यांनी जाहीर केली.
-------
कोट
आमदार प्रशांत ठाकूर माझ्याविषयी काय बोलले मी ऐकले नाही; परंतु गेली २२ वर्षे मी पक्षाचे काम करत आहे. कदाचित आमदार प्रशांत ठाकूर यांचा काहीतरी गैरसमज झाला असेल. त्यांचा गैरसमज मी भेटून दूर करीन. माझे यासंर्भात पक्षश्रेष्टी बोलणे झाले असून, ते आमदार साहेबांचा गैरसमज दूर करतील.
- विक्रांत पाटील, आमदार विधान परिषद

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com