रस्ता-पाणी प्रश्नांवर शिंदे शिवसेनेचे नगरसेवक आक्रमक
निवडीनंतर नगरसेवक थेट रस्त्यावर
कॅम्प-४मधील कामाचा घेतला आढावा; पाणीटंचाईवर ठोस भूमिका
उल्हासनगर, ता. ४ (वार्ताहर) : निवडणुकीनंतर पदभार स्वीकारताच उल्हासनगरमधील नवनिर्वाचित नगरसेवकांनी आता जनसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी थेट रस्त्यावर उतरण्यास सुरुवात केली आहे. कॅम्प क्रमांक ४ मधील प्रलंबित रस्ते आणि पाणीपुरवठ्याच्या समस्यांची नगरसेवकांनी प्रत्यक्ष पाहणी करून नागरिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला.
उल्हासनगर कॅम्प क्रमांक-४ मधील पॅनेल क्रमांक १५ अंतर्गत सुरू असलेल्या पूनम हॉटेल ते सतरामदास हॉस्पिटल या मुख्य रस्त्याच्या बांधकामाची पाहणी नुकतीच शिंदे गटाचे नगरसेवक अरुण आशान यांच्यासह निखिल पाटील, अमर जग्यासी आणि नितीन सपकाळे यांनी केली. या पाहणीदरम्यान नागरिकांनी रस्त्यांची दयनीय अवस्था, सुरू असलेल्या खोदकामामुळे निर्माण झालेली धूळ व चिखल, वाहतुकीची गैरसोय आणि पाणीपुरवठ्याच्या गंभीर समस्यांबाबत आपला संताप व्यक्त केला. अनेक दिवसांपासून रस्ता अपूर्ण अवस्थेत असल्याने शाळकरी विद्यार्थी, रुग्ण, ज्येष्ठ नागरिक आणि वाहनचालकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत असल्याचे नागरिकांनी सांगितले.
नागरिकांना मूलभूत सुविधा मिळणे हा त्यांचा हक्क आहे. रस्ता आणि पाणी या प्रश्नांवर कोणतीही तडजोड केली जाणार नाही, अशी भूमिका या वेळी स्थानिक नगरसेवक अरुण आशान यांनी व्यक्त केली. या पाहणीमुळे परिसरातील नागरिकांमध्ये काही प्रमाणात दिलासा निर्माण झाला असून, आता दिलेल्या आश्वासनांची प्रत्यक्ष अंमलबजावणी किती लवकर होते, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
कोणालाही पाठीशी घातले जाणार नाही
नागरिकांच्या तक्रारी ऐकून घेत नगरसेवकांनी परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी केली आणि संबंधित रस्ता बांधकाम लवकरात लवकर पूर्ण करण्यात येईल, असे आश्वासन दिले. तसेच पाणीपुरवठ्याच्या समस्येवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात येतील, अशी ग्वाहीही त्यांनी दिली. या वेळी नगरसेवकांनी संबंधित महापालिका अधिकारी व ठेकेदारांशी सातत्याने समन्वय ठेवून कामाच्या प्रगतीवर लक्ष ठेवले जाईल. कामात दिरंगाई, हलगर्जी किंवा निकृष्ट दर्जा आढळल्यास कोणालाही पाठीशी घातले जाणार नाही, असा इशाराही दिला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

