हरवलेली लेक नऊ वर्षांनी अखेर घरी परतली
हरवलेली लेक नऊ वर्षांनी अखेर घरी परतली
सामाजिक संस्था आणि पोलिसांच्या जिद्दीला यश
टिटवाळा, ता. ४ : नऊ वर्षांपासून बेपत्ता असलेली प्रमिला सोनावणे ही तरुणी अखेर आपल्या कुटुंबाला भेटली आहे. चेन्नईचे होप ट्रस्ट, कर्जतचे श्रद्धा पुनर्वसन केंद्र आणि टिटवाळा पोलिसांच्या अथक परिश्रमामुळे हा भावनिक पुनर्मिलनाचा क्षण प्रत्यक्षात उतरला. प्रमिला २०१७ मध्ये जळगावमधून बेपत्ता झाली होती. मानसिक आजारामुळे ती भटकत थेट चेन्नईला पोहोचली. ३१ मे २०२२ रोजी चेन्नईतील होप पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टने तिला निराधार अवस्थेत ताब्यात घेतले. प्रदीर्घ उपचार आणि समुपदेशनानंतर तिला ६ जानेवारीला कर्जत येथील श्रद्धा पुनर्वसन केंद्रात पाठवण्यात आले.
कर्जत केंद्रातील समाजसेविका नीलम राणा शिरसाठ यांनी प्रमिलाला बोलते केले. तिने टिटवाळ्याचा एक पुसटसा पत्ता सांगितला. गुगल मॅपवर माहिती मिळत नसतानाही हार न मानता त्यांनी टिटवाळा पोलिसांशी संपर्क साधला. हवालदार अनिल महाजन, राहुल बागूल आणि ज्योत्स्ना पडवळ यांनी प्रमिलाच्या वडिलांची माहिती शोधून काढली. तिचे वडील शहापूरमधील एका शाळेत शिपाई होते. तपासाची चक्रे फिरली आणि योगायोगाने तिचे वडील कामासाठी टिटवाळ्यात आले असतानाच ही आनंदाची बातमी त्यांच्यापर्यंत पोहोचली. पाचवीत असताना तिला फिट्सचा आजार जडला आणि ती मानसिकदृष्ट्या अस्थिर झाली. नऊ वर्षे ती आमच्यापासून दूर होती; पण आज ती सुखरूप परतली आहे, अशा शब्दांत प्रमिलाच्या वडिलांनी भावना व्यक्त केल्या.
निराधार रुग्णांसाठी आशेचा किरण
मानसोपचारतज्ज्ञ डॉ. भरत वातवणी यांनी स्थापन केलेली ही संस्था रस्त्यावर भटकणाऱ्या मानसिक रुग्णांचे मोफत पुनर्वसन करते. केवळ औषधोपचार नाही, तर त्यांना सन्मानाने त्यांच्या घरी पोहोचवण्याचे महान कार्य ही संस्था करते.
तपास पथकाचे विशेष कौतुक
उपविभागीय पोलिस अधिकारी (मुरबाड) अनिल लाड आणि वरिष्ठ पोलिस निरीक्षक पंकज गिरी यांच्या मार्गदर्शनाखाली टिटवाळा पोलिसांनी केवळ कागदोपत्री काम न करता माणुसकीच्या भावनेतून हा शोध पूर्ण केला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

