मुंबई- पुणे द्रुतगती महामार्ग वाहतूक कोंडी
महामार्गावर आपत्कालीन सुविधा काय?
पर्यायी व्यवस्थेची वानवा; वाहतूकतज्ज्ञांचा सवाल
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ४ ः मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर उलटलेल्या गॅस टँकरमुळे हा मार्ग २४ तासांहून अधिक काळ वाहतुकीसाठी ठप्प झाला. त्यामुळे हजारो प्रवासी व वाहनचालकांना प्रचंड त्रासाला सामोर जावे लागले. स्वच्छतागृहाची वानवा, खाण्या-पिण्याची आबाळ झाल्यामुळे लहान मुले, ज्येष्ठ नागरिक, विशेषता आजारी व्यक्तींचे हाल झाले.
मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील अशा आपत्कालीन परिस्थितीत प्रवाशांसाठी तत्काळ सुविधा व पर्यायी व्यवस्था उपलब्ध का करून दिली जात नाही, असा सवाल वाहतूकतज्ज्ञांकडून विचारला जात आहे. जगभरातील विकसित देशांमध्ये अशा स्वरूपाचे अपघात झाल्यास तासाभरात वाहतूक पूर्वपदावर येते, कारण महामार्ग विकसित करताना या संकटाचा विचार करून त्यामध्ये पर्यायी मार्गाचा, व्यवस्थेचा अंतर्भाव केला जातो; मात्र देशातला पहिला द्रुतगती मार्ग असलेल्या मुंबई-पुणे मार्गावर यावर फारसा विचार केला गेला नसल्याचे वाहतूकतज्ज्ञांनी सांगितले. सेव्ह लाइफ फाउंडेशनचे संस्थापक पीयूष तिवारी यांनी सांगितले, की ‘धोकादायक रसायनांशी संबंधित घटनांमध्ये प्राथमिक तांत्रिक जबाबदारी ही या पदार्थांची वाहतूक करणाऱ्या कंपन्यांची असते; मात्र अपघातानंतर बचाव वाहने किंवा पोलिस पथकांनी रासायनिक व्यवस्थापन युनिट्स म्हणूनही काम करावे, अशी अपेक्षा आहे; मात्र ते वास्तववादी नाही, त्यामुळे विशेषज्ञांचे पथक येईपर्यंत महामार्ग बंद ठेवणे, हाच अनेकदा सर्वात सुरक्षित पर्याय मानला जातो; मात्र भविष्यात, रासायनिक व्यवस्थापन कृती दल आणि एक नियमावली आवश्यक आहे.’
महामार्गावर अपघातानंतर वाहतूक सुरळीत करण्यासाठी व्यवस्था किंवा विशिष्ट प्रणाली नाही. सरकारने याबाबत धोरणात्मक निर्णय घेतला पाहिजे. इतर विकसित देशात अशा घटना घडल्यानंतर तासाभरात वाहतूक सुरळीत होते. महामार्ग ठप्प झाल्यास त्याचा परिणाम विविध वस्तूंच्या पुरवठ्यावर होतो. मुंबई-पुणे महामार्गावरील अपघाताचा परिणाम संपूर्ण दक्षिण भारतातील वाहतुकीवर होतो.
- बाल मालकीत सिंग, माजी अध्यक्ष, ऑल इंडिया मोटार ट्रान्स्पोर्ट काँग्रेस
==
मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर एका अपघातानंतर हा मार्ग २४ तास बंद राहणे ही अत्यंत गंभीर व दुर्दैवी बाब आहे. हजारो वाहनांमध्ये अडकलेले नागरिक, महिला व लहान मुले कोणत्याही मूलभूत सुविधांशिवाय ताटकळत असणे हे प्रशासनाच्या अपयशाचे स्पष्ट उदाहरण आहे. या महामार्गावर टोलवसुली करताना, आपत्कालीन परिस्थितीत प्रवाशांना तत्काळ सुविधा व पर्यायी व्यवस्था उपलब्ध करून देणे ही त्यांची जबाबदारी आहे. या महामार्गावर वारंवार वाहतूक कोंडी होण्याची शक्यता लक्षात घेता, वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी शाश्वत व कायमस्वरूपी उपाययोजना करणे आवश्यक आहे.
- सुशील पठारे, वाहतूक अभ्यासक, परिसर संस्था
===
मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर एक मार्गिका खोळंबली तरी हा महामार्ग ठप्प होतो. घटनास्थळी आवश्यक यंत्रणा आणि बचाव पथक तातडीने पोहोचून वाहतूक सुरळीत करण्याची आवश्यकता असते; मात्र त्यासाठी एक कार्यप्रणाली विकसित करणे गरजेची आहे. घडलेल्या अपघाताचा अभ्यास करून त्यातून ठोस उपाययोजना राबविल्या पाहिजेत.
- रणजित गाडगीळ, वाहतूकतज्ज्ञ
==
गॅसची वाहतूक करणाऱ्या टँकरमध्ये ऑइल एका बाजूला येते. त्यामुळे टँकरच्या संतुलनावर परिणाम होतो, टँकर उलटण्याची शक्यता असते; परंतु चालकाने वळण पाहून मध्यभागी वाहन ठेवले पाहिजे. या चालकांना विशेष प्रशिक्षण दिले जाते. त्यामुळे अशा सर्वच वाहनांवरचा चालक हा प्रशिक्षित असणे गरजेचे आहे.
- डॉ. शंकर विश्वनाथ, वाहतूकतज्ज्ञ
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

