जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान

जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान

Published on

...तर संख्याबळानुसार विरोधी पक्षनेता आमचाच : मनोज प्रधान
ठाणे पालिकेत राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या दृष्टीने सकारात्मक पाऊल

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ४ : राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार आणि अजित पवार असे दोन गट पुन्हा एकत्र येण्याच्या चर्चांना वेग आला असतानाच ठाणे महापालिकेत विरोधी पक्ष नेतेपदाच्या मुद्द्यावरून दोन्ही गटांमध्ये जवळीक वाढताना दिसत आहे. विलीनीकरण झाले तर विरोधी पक्षनेतेपद अजित पवार गटाला देण्यास आमची कोणतीही हरकत नाही; मात्र विलीनीकरण न झाल्यास संख्याबळाच्या आधारे हे पद आमच्याकडेच राहील, अशी स्पष्ट भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) गटाचे जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांनी मांडली आहे.

ठाणे महापालिकेच्या महापौरपदाची निवडणूक पार पडल्यानंतर आता विरोधी पक्ष नेतेपदावरून राजकीय हालचालींना वेग आला आहे. सध्याच्या स्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) गटाचे १२, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) गटाचे पाच, तर एमआयएमचे पाच नगरसेवक आहेत. मात्र या तिन्ही पक्षांनी कोकण विभागकडे स्वतंत्र नोंदणी केल्याने सर्वाधिक नगरसेवक असलेला राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) गट हा महापालिकेतील सर्वात मोठा विरोधी पक्ष ठरत आहे. त्यामुळे विरोधी पक्ष नेतेपद आमच्याच पक्षाला मिळावे, अशी ठाम भूमिका या गटाने घेतली आहे.

तीन दिवसांत निर्णय
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) गटाचे जिल्हाध्यक्ष नजीब मुल्ला यांनी विरोधी पक्ष नेतेपदाबाबत दोन्ही पर्याय खुले असल्याचे सांगितले असून, यासंदर्भात येत्या दोन ते तीन दिवसांत निर्णय होईल, असे स्पष्ट केले आहे. दोन्ही राष्ट्रवादी गटांचे विलीनीकरण झाल्यास ज्येष्ठतेचा विचार करून नजीब मुल्ला यांना विरोधी पक्ष नेतेपद देण्याची तयारी असल्याचे मनोज प्रधान यांनी सांगितले. त्यामुळे ठाणे महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) गटाने विलीनीकरणाच्या दृष्टीने सकारात्मक भूमिका घेतल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. आता यावर अजित पवार गट काय भूमिका घेतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
…………….

स्वतंत्र नोंदणीचा मुद्दा निर्णायक
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार), राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) आणि एमआयएम या तिन्ही पक्षांनी कोकण विभागाकडे स्वतंत्र नोंदणी केली आहे. त्यामुळे सध्याच्या स्थितीत अधिक नगरसेवक असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) गटालाच नियमानुसार विरोधी पक्षनेतेपद मिळण्याची शक्यता आहे; मात्र राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) आणि एमआयएम यांनी एकत्र येऊन दावा करायचा असल्यास त्यासाठी प्रथम अधिकृत विलीनीकरण आवश्यक असल्याचे जाणकारांचे मत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com