

पालिका तपासणीत सापडले दोन लाख कर्करोगग्रस्त
आजाराविराेधातील लढ्यात प्राथमिक आरोग्य केंद्रांची महत्त्वाची भूमिका
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ५ : कर्करोगासारख्या गंभीर आजाराविरुद्धच्या लढ्यात मुंबई महापालिकेची प्राथमिक आरोग्य केंद्रे महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. आपला दवाखाना, महापालिकेची प्रसूतिगृहे आणि बहुवैद्यकीय दवाखान्यांमध्ये आतापर्यंत दोन लाखांहून अधिक नागरिकांची कर्करोग तपासणी करण्यात आली असून, त्यापैकी ५६ जणांमध्ये कर्करोगाची खात्री झाली आहे. केवळ तपासणीच नव्हे, तर उपचार कुठे आणि कसे घ्यावेत याबाबत रुग्णांना मार्गदर्शनही केले जात आहे.
राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या सूचनांनुसार आणि केंद्र सरकारच्या राष्ट्रीय असंसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत महापालिकेने कर्करोगाविरोधातील जनजागृती आणि तपासणी मोहीम अधिक तीव्र केली आहे. ३१ मार्च २०२६ पर्यंत गर्भाशय मुख आणि स्तन कर्करोगाच्या तपासणी शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे. तसेच ३० वर्षांवरील महिला आणि पुरुषांची तोंडाच्या कर्करोगाची तपासणी आपला दवाखाना आणि बहुवैद्यकीय दवाखान्यांमध्ये सुरू आहे.
महापालिकेच्या माहितीनुसार, आतापर्यंत दोन लाख ९५ हजार सहाशे नागरिकांची तोंडाच्या कर्करोगासाठी तपासणी करण्यात आली. त्यापैकी सुमारे तीन हजार संशयित रुग्ण आढळले. यातील ६५० जणांची बायोप्सी करण्यात आली असून, २४ जणांमध्ये तोंडाच्या कर्करोगाची खात्री झाली आहे. या सर्व रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
स्तन आणि गर्भाशय मुख कर्करोगासाठी ५४ हजार १०० महिलांची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये तीन हजार ६५६ संशयित रुग्ण आढळले. त्यापैकी ३१४ महिलांची बायोप्सी करण्यात आली असून, ३२ जणांमध्ये कर्करोगाची पुष्टी झाली आहे.
महापालिकेच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. दक्षा शाह यांनी सांगितले की, गेल्या वर्षी फेब्रुवारीपासून सुरू करण्यात आलेल्या तोंड, स्तन आणि गर्भाशय मुख कर्करोग तपासणी मोहिमेला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. पूर्वी या तपासण्यांसाठी मोठ्या रुग्णालयांमध्ये जावे लागत होते. मात्र, आता प्राथमिक स्तरावरच ‘आपला दवाखाना’ आणि प्रसूतिगृहांमध्ये सर्व तपासण्या उपलब्ध आहेत. कर्करोगाची खात्री झाल्यास रुग्णांना योग्य रुग्णालयात उपचारासाठी मार्गदर्शन करण्यात येत आहे.
वेळीच उपचार महत्त्वाचे
स्तन, तोंड आणि गर्भाशय मुख कर्करोगाचे अनेक रुग्ण आजही आजाराच्या शेवटच्या टप्प्यात उपचारासाठी येतात. त्यामुळे मृत्यूचा धोका वाढतो. वेळेवर तपासणी आणि आजाराची ओळख झाल्यास सुरुवातीच्या टप्प्यातच उपचार शक्य होतात आणि कर्करोगावर मात करता येते. याच उद्देशाने महापालिकेने प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्येच या तीन प्रमुख कर्करोगांच्या तपासणीची सुविधा सुरू केली असून, प्रत्येक वॉर्डात रुग्णांना तपासणी आणि उपचारासाठी मार्गदर्शन करणारी व्यवस्था महत्त्वाची ठरत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.