खावडा कपंनीची मनमानी
खावडा प्रकल्पाविरोधात शेतकऱ्यांचा एल्गार
जिल्हाधिकाऱ्यांच्या मध्यस्थीने काही मागण्या मान्य, तरीही लढा कायम
वज्रेश्वरी, ता. ५ (बातमीदार) : पालघर आणि ठाणे जिल्ह्यातून जाणाऱ्या खावडा पॉवर ट्रान्समिशनच्या अति उच्च दाब विद्युत वाहिनी प्रकल्पावरून शेतकरी आणि कंपनी प्रशासन यांच्यातील वाद उफाळून आला आहे. कंपनीच्या मनमानी कारभाराविरोधात शेतकऱ्यांनी एल्गार पुकारला होता. अखेर ठाणे जिल्हाधिकारी श्रीकृष्णनाथ पांचाळ यांच्या मध्यस्थीनंतर कंपनीने एक पाऊल मागे घेतले असून शेतकऱ्यांच्या काही प्रमुख मागण्या मान्य केल्या आहेत.
पालघर आणि भिवंडी परिसरातून नवसारी-पडघे आणि बोईसर-पुणे ७६५ के.व्ही. विद्युत वाहिनीचे काम सुरू आहे. हे काम करताना शेतकऱ्यांना कोणतीही पूर्वकल्पना न देता, जमिनीचा योग्य मोबदला न देता मनोरे उभारले जात असल्याचे धर्मवीर विचार मंच आणि प्रकल्प बाधित कृती समितीने म्हंटले आहे. याविरोधात शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी तहसील कार्यालय प्रांत या ठिकाणी आंदोलने करण्यात आली. परंतु, प्रशासनाकडून केवळ तोंडी आश्वासने दिली गेली. या पार्श्वभूमवीर १५ फेब्रुवारीपर्यंत सकारात्मक निर्णय घ्यावा. अन्यथा धर्मवीर विचार मंचच्या वतीने सोमवार (ता. १६)पासून जिल्हाधिकारी कार्यालयावर बेमुदत बिऱ्हाड मोर्चा आंदोलन करण्यात येईल, असा इशारा दिला होता.
या इशाऱ्यामुळे प्रशासकीय यंत्रणा हलली असून जिल्हाधिकारी कार्यालयात तातडीची बैठक पार पडली. या बैठकीत श्रीकृष्णनाथ पांचाळ शेतकरी कृती समितीचे मुख्य समन्वय राजन गावंडे, भगवान सांबरे यांच्यासह शेतकरी, भिवंडी उपविभागीय अधिकारी अमित सानप, पोलिस प्रशासन आणि खावडा टावर लाईनचे अधिकारी उपस्थित होते. दरम्यान, राजन गावंड व भगवान सांबरे यांनी आम्ही अर्धी लढाई जिंकली आहे. पुढील लढाई चालू ठेऊ, अशी प्रतिक्रिया दिली आहे.
प्रमुख मागण्या
बाधीत शेतकऱ्यांना प्रति चौ.मी. रक्कम रू.१० हजार रूपये इतका एकसमान भाव द्यावा. विद्युत वाहिनीखालील बाधित शेतकऱ्यांना १०० टक्के मोबदला द्यावा. वाडा तालुक्यातील बोरांडे गावात रेडी रेकनरचा दर १२५३/- असताना पूर्वी तो १४४१/- कसा दिला होता? यावर लेखी खुलासा मागण्यात आला. ताड, माड, खजूर आणि मोहाच्या झाडांचे मूल्यांकन कृषी विभागाकडे सोपवावे.
जिल्हाधिकाऱ्यांच्या मध्यस्थीने कंपनीचे पाऊल मागे
भिवंडी तालुक्यातील वीस गावांमधून उच्च दाबाची टॉवर लाईन जात आहे. या टॉवर लाईनचे अधिकारी आणि कर्मचारी शेतकऱ्यांवर जोर जबरदस्ती करून पोलिसांचा धाक दाखवून काम करत होते. मात्र, टॉवर लाईनला शेतकऱ्यांचा कोणताही विरोध नसताना खावड्याच्या अधिकाऱ्यांना पोलिस बंदोबस्ताची आवश्यकता का लागली, असा सवाल शेतकऱ्यांनी यावेळी विचारला. अखेर श्रीकृष्णनाथ पांचाळ यांच्या मध्यस्थीने खावडा टॉवर लाईनच्या अधिकाऱ्यांनी एक पाऊल मागे घेत काही मागण्या मान्य केल्या.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

