ढगाळ हवामानामुळे आंबा पिकावर संकट

ढगाळ हवामानामुळे आंबा पिकावर संकट

Published on

ढगाळ हवामानामुळे आंबा पिकावर संकट
जव्हारमध्ये मोहोर भरघोस; मात्र रोगराई रोखण्यासाठी फवारणी आवश्यक

जव्हार, ता. ५ (बातमीदार) : दुर्गम आणि आदिवासी भाग असलेल्या जव्हार तालुक्यात सुधारित शेतीच्या माध्यमातून प्रगती होऊ लागली आहे. हापूस, केशर, तोतापुरी, राजापुरीसारख्या कलमांची ९०४ हेक्टरमध्ये लागवड असल्याने येथील शेतकऱ्यांना उत्पन्नाचे साधन प्राप्त झाले आहे. यंदा तर आंबा आठ-दहा दिवसांपूर्वीच मोहरला असल्याने फळधारणा चांगली येण्याची आशा शेतकऱ्यांना लागली आहे; मात्र सध्याच्या ढगाळ वातावरणामुळे करपा, भुरीसारखा रोग पडण्याची शक्यता असल्याने कृषी विभागाने शेतकऱ्यांकरिता मार्गदर्शक सूचना किंवा शिबिरे घ्यावीत, अशी मागणी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या वतीने होत आहे.
मागील वर्षी आंबा मोहोर अत्यल्प प्रमाणात लागल्याने उत्पादनात मोठी घट झाली होती. त्याचा बऱ्याच शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसला होता. यंदा मात्र २०२५-२६ या हंगामात निसर्ग अनुकूल ठरल्याने आंबा मोहोर साधारण दोन आठवडे लवकर आणि भरघोस प्रमाणात आला आहे. अनेक ठिकाणच्या झाडांना मोहोर फुलला आहे. निसर्गाची अशीच साथ मिळाल्यास यावर्षी आंबा फळांचे विक्रमी व दर्जेदार उत्पादन होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मोहरलेले आम्रवृक्ष उत्पादकांना समाधान देणारे ठरत आहेत; मात्र विपुल, निरोगी आणि दर्जेदार उत्पादन मिळविण्यासाठी खत, पाणी, औषध फवारणी, छाटणी, खांडणी, प्रकाश व हवा या सर्व बाबींचे अचूक व्यवस्थापन अत्यावश्यक आहे. महत्त्वाचे अद्याप अनेक शेतकऱ्यांना आंबा फळबागेचे अचूक आर्थिक व तांत्रिक गणित उलगडलेले नाही. डाळिंब, द्राक्षे, पेरू, बोर यांसारखे काटेकोर व्यवस्थापन आंब्यालाही लागू केल्याशिवाय अपेक्षित उत्पादन मिळणार नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी नवतंत्रज्ञान स्वीकारणे काळाची गरज असल्याचे सांगण्यात येत आहे.
------------------------
ढगाळ वातावरणात फवारणी आवश्यक
जव्हार तालुक्यात वातावरणात बदल होत, ढगाळ वातावरण तयार होत आहे. अशा परिस्थितीत करपा, भुरी, मावा, तुडतुडे यांचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढतो. यावर वेळीच नियंत्रण मिळाले नाही, तर फळधारणा कमी होऊन फळगळ मोठ्या प्रमाणात होते. गेल्या आठवड्यात पडलेल्या तीव्र थंडीमुळे अनेक ठिकाणी करप्याचा प्रादुर्भाव वाढून फुले करपली आहेत. पुढील काळातही थंडीची लाट व ढगाळ हवामान राहण्याची शक्यता असून, अशा प्रतिकूल वातावरणात एक ते दोन फवारे आवश्यक आहेत. हवामान अधिक बिघडल्यास तिसरा फवारा घेणे फायदेशीर ठरेल, असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे.

-------
कृषी विभागाचा सल्ला

मोहोर लागल्याने परागीभवन करणाऱ्या मधमाश्यांचे संरक्षण करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यामुळे सौम्य व नाजूक औषधांचीच फवारणी करावी. करंज तेल व नीम तेल यांचे आलटून पालटून फवारे घ्यावेत. २० लिटर पाणी पंपासाठी लिक्विड गंधक हे २५ ते ३० मिलिलिटर, नीम तेल हे ३५ ते ४० मिलिलिटर, स्टीकर म्हणून लिक्विड साबण हे तीन मिलिलिटर असे मिश्रण नीट एकत्र करून फवारणी करावी. वेळीच सर्व व्यवस्थापन पूर्ण केल्यास विपुल उत्पादन मिळून शेतकऱ्यांना चांगला आर्थिक लाभ होईल.
- डॉ. विलास जाधव,
वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख, कृषी विज्ञान केंद्र, कोसबाड हिल
---------------------
गेल्या चार ते पाच दिवसांपासून ढगाळ वातावरण असल्याने मोहरलेल्या आंब्यावर भुरी, करप्यासारखे रोग पडू शकतात. त्यामुळे कृषी विभागाने शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी काही उपाययोजना किंवा शिबिराचे आयोजन करणे आवश्यक आहे.
- गणपत गावंढा, शेतकरी, वनवासी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com