ठाण्यात निम्माच दूधपुरवठा
शहरात दुधाचा निम्माच पुरवठा
एक्स्प्रेसवेवरील अपघाताचा ठाण्याला फटका
ठाणे, ता. ५ : मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर गॅस टँकर उलटल्याने झालेल्या ३२ तासांच्या अभूतपूर्व वाहतूक कोंडीचा मोठा फटका ठाणे शहराला बसला आहे. या कोंडीमुळे शहराची ‘दूधवाहिनी’ विस्कळित झाली असून, गुरुवारी ठाण्यात केवळ ५० टक्केच दूधपुरवठा होऊ शकला. परिणामी, सकाळपासूनच अनेक भागांत दुधाचा मोठा तुटवडा निर्माण झाला असून, नागरिकांची प्रचंड गैरसोय झाली.
ठाणे शहराला प्रामुख्याने कोल्हापूर, सांगली, सातारा आणि पुणे या जिल्ह्यांतून दररोज साडेपाच ते सहा लाख लिटर दुधाचा पुरवठा होतो. या भागांतून येणारे दुधाचे टँकर आणि पिशव्यांची वाहने द्रुतगती मार्गावरील कोंडीत अडकली. अनेक वाहने तासन्तास अडकून पडली, तर काही वाहनांना शहरात प्रवेश न मिळाल्याने ती माघारी फिरली. याचा थेट परिणाम गुरुवारी सकाळच्या वितरणावर झाला.
हॉटेल आणि किरकोळ विक्रेते हवालदिल
दूधटंचाईचा फटका केवळ सर्वसामान्य नागरिकांनाच नाही, तर हॉटेल व्यावसायिक आणि किरकोळ विक्रेत्यांनाही बसला. दूध केंद्रांवर नेहमीपेक्षा अर्ध्याच पिशव्या आल्याने अनेक ग्राहकांना रिकाम्या हाताने परतावे लागले.
उपलब्ध असलेले दूध संपू नये म्हणून काही विक्रेत्यांनी प्रति ग्राहक केवळ एकच पिशवी देण्याचा निर्णय घेतला. नवी मुंबईतील महानंदा, गोकूळ आणि वारणा यांसारख्या मोठ्या डेअरींकडे जाणारे टँकरही वेळेत पोहोचले नाहीत.
३२ तासांचा ‘खोळंबा’ महागात
गॅस टँकरच्या अपघातानंतर सुरक्षिततेच्या कारणास्तव महामार्ग बंद ठेवण्यात आला होता. ही कोंडी फुटण्यास ३२ तास लागल्याने केवळ दूधच नाही, तर इतर जीवनावश्यक वस्तूंच्या वाहतुकीवरही परिणाम झाला आहे. परिस्थिती हळूहळू पूर्ववत होत असली तरी, पूर्ण पुरवठा सुरळीत होण्यासाठी आणखी काही काळ लागण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

