वसईत १,००० कोटी रुपयांहून अधिक मूल्याच्या जमिनीचा घोटाळा उघडकीस

वसईत १,००० कोटी रुपयांहून अधिक मूल्याच्या जमिनीचा घोटाळा उघडकीस

Published on

बनावट कागदपत्रांद्वारे जमीनविक्री
वसईत एक हजार कोटींचा गैरव्यवहार उघडकीस
विरार, ता. ५ (बातमीदार) ः जमिनीचे रीतसर ७/१२ उतारे, नोंदणीकृत खरेदीखत आणि साठेकरार अस्तित्वात असतानाही, कालबाह्य आणि रद्द झालेल्या ‘पॉवर ऑफ ॲटर्नी’ तसेच बिगर नोंदणीकृत कागदपत्रांच्या आधारे ६५ एकर जमिनीची परस्पर विक्री करण्यात आली. या प्रकरणात जवळपास एक हजार कोटींचा गैरप्रकार वसईत उघडकीस आला. याप्रकरणी हेमंत पाटील, धर्मेश शहा यांच्यासह इतर साथीदारांविरोधात नायगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या गैरव्यवहारात तत्कालीन तहसीलदार आणि तलाठ्यांनी नियमांचे उल्लंघन करून आरोपींना मदत केल्याचा आरोपही तक्रारीत करण्यात आला.
धनश्री डेव्हलपर्सचे संचालक शंकरराव अंबऋषी बोरकर (वय ६६) यांनी याप्रकरणी मिरा-भाईंदर वसई-विरार पोलिस आयुक्तांकडे तक्रार केली होती. बोरकर यांच्या तक्रारीनुसार, आरोपी हेमंत पाटील, धर्मेश शहा, दीपक खोचरे, मच्छिंद्र भोईर यांनी २००८ पासून बोरकर यांचा विश्वास संपादन केला. त्यानुसार नायगाव (पूर्व) येथील मौजे टिवरी येथील बोरकर यांची ६५.३३ एकर जमिनीबाबत बनावट कागदपत्रे तयार करून ती बेकायदा विकण्यात आली. जमिनीचे रितसर ७/१२ उतारे, नोंदणीकृत खरेदीखत आणि साठेकरार अस्तित्वात होते. तरीही कालबाह्य आणि रद्द झालेल्या ‘पॉवर ऑफ अ‍ॅटर्नी’चा वापर करीत बिगर-नोंदणीकृत कागदपत्रांच्या आधारे अनेक सर्व्हे नंबरच्या जमिनी परस्पर विकण्यात आल्याचा आरोप केला आहे. बोरकर यांच्या संमतीशिवाय डीडीपीएल ग्लोबल प्रा.लि. आणि युनिकॉर्न इस्टेट प्रा.लि. या कंपन्यांच्या नावावर जमिनीची खोटी नोंदणी करण्यात आली. याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने बुधवारी रात्री हेमंत पाटील, धर्मेश शहा, दीपक खोचरे, मच्छिंद्र भोईर आणि इतर साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
---
अधिकाऱ्यांचाही हातभार
जमीन गैरव्यवहाराची व्याप्ती प्रचंड मोठी असून, अनेक आजी-माजी महसूल अधिकाऱ्यांचा सहभाग असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. वसई-२ निबंधक कार्यालयातील तत्कालीन तहसीलदार आणि तलाठ्यांनी महसुली नियमांचे उल्लंघन करून आरोपींना मदत केल्याचा गंभीर आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
---
ईडी, सीबीआयकडे तपास?
आर्थिक गैरव्यवहाराची व्याप्ती लक्षात येता, या प्रकरणाचा तपास ईडी किंवा सीबीआयकडे सोपवला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे वसई-विरार परिसरातील अनेक जमीन खरेदीदारांचे धाबे दणाणले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com