मुलांना सक्षम बनवणे म्हणजे राष्ट्र उभारणीच - सुमेधा चिथडे

मुलांना सक्षम बनवणे म्हणजे राष्ट्र उभारणीच - सुमेधा चिथडे
Published on

मुलांना सक्षम बनवणे हीच खरी राष्ट्र उभारणी : सुमेधा चिथडे
कल्याण, ता. १० (वार्ताहर) : आपण मुलांवर काय संस्कार करतो आणि त्यांना काय शिकवतो, यावर देशाचे भविष्य अवलंबून आहे. इतिहास चुकीचा समजल्यामुळे आज भूगोल बदलू लागला आहे. जर चुकीच्या कृत्याला शासन झाले नाही तर अनुशासन (शिस्त) पाळले जाणार नाही. मन, मनगट आणि मेंदू या तिन्ही स्तरांवर आपल्या मुलांना सक्षम बनवणे हीच खरी राष्ट्र उभारणी आहे, असे परखड मत सुमेधा चिथडे यांनी कल्याण येथे व्यक्त केले.

रविवारी (ता. ८) उज्ज्वला मंडळातर्फे ‘वंदे मातरम्’ गीताच्या शतकोत्तर सुवर्णपूर्तीनिमित्त ऐतिहासिक सुभेदार वाड्यात एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी सुमेधा चिथडे यांनी राष्ट्राय इदं न मम या विषयावर दृक-श्राव्य माध्यमातून उपस्थितांशी संवाद साधला. केवळ उपभोगाची माहिती असण्यापेक्षा त्यागाचे महत्त्व समजून घेणे गरजेचे आहे. आपल्या गरजा कमी केल्यास आयुष्य सुंदर होते, असा मोलाचा सल्ला चिथडे यांनी दिला.

शालेय विद्यार्थ्यांचा सहभाग
मुलांमध्ये राष्ट्रभावना जागृत करण्यासाठी विविध शाळांमधील विद्यार्थ्यांना आणि गृहिणींना संपूर्ण ‘वंदे मातरम्’ शिकवण्यात आले, अशी माहिती मंडळाच्या अध्यक्षा सुनीता केळकर यांनी दिली. कार्यक्रमाची सुरुवातही सामूहिक ‘वंदे मातरम्’ गायनाने झाली.

सैनिकांसाठी मदतीचा हात
सुमेधा चिथडे या केवळ बोलत नाहीत तर त्या प्रत्यक्ष कृतीशील आहेत. उणे ३५ अंश सेल्सिअस तापमान असलेल्या आणि १८ हजार फूट उंचीवर असलेल्या दुर्गम युद्धभूमीवर भारतीय सैनिकांसाठी त्यांनी स्वखर्चाने व लोकसहभागातून ऑक्सिजन प्लांट उभारला आहे. त्यांच्या या अतुलनीय कार्याची दखल घेऊन उज्ज्वला मंडळाने कार्यक्रमात जमा झालेला सर्व निधी चिथडे यांच्या सामाजिक कार्यासाठी सुपूर्द केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com