

ई-गव्हर्नन्समध्ये ठाणे जिल्हा परिषदेची उत्तुंग भरारी
राज्यात पटकावला तिसरा क्रमांक; २०० पैकी १७६ गुण, हायटेक कारभारावर शिक्कामोर्तब
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १० : प्रशासकीय कामकाजात आधुनिक तंत्रज्ञान, गतिमानता आणि पारदर्शकतेचा मेळ घालत ठाणे जिल्हा परिषदेने राज्याच्या ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमात घवघवीत यश संपादन केले आहे. राज्यातील सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या जिल्हा परिषदांच्या श्रेणीत ठाणे जिल्ह्याने तिसरा क्रमांक पटकावला असून, २०० पैकी १७६.२५ इतके गुण मिळवले आहेत.
राज्यातील १५० दिवसांच्या ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमांतर्गत शासकीय कार्यालयांचे कामकाज तंत्रज्ञानाधारित करण्यासाठी विशेष मोहीम राबवण्यात आली होती. यामध्ये प्रामुख्याने त्रयस्थ संस्थेमार्फत कार्यालयाची अद्ययावत वेबसाइट आणि आपले सरकार प्रणालीची प्रभावी अंमलबजावणी, व्हॉट्सॲप चॅटबॉट, ई-ऑफिस आणि डॅशबोर्डचा वापर, कृत्रिम बुद्धिमत्ता, ब्लॉकचेन आणि जीआयएस आधारित सेवांचा समावेश, पेपरलेस कारभाराकडे वाटचाल आणि ऑनलाइन सेवांची सुलभता याचे सखोल मूल्यमापन करण्यात आले. त्यानंतर आता निवडणूक आचारसंहितेमुळे प्रलंबित असलेला हा निकाल नुकताच जाहीर झाला असून, यात पुणे आणि सांगलीपाठोपाठ ठाणे जिल्हा परिषदेने बाजी मारली आहे. त्यानंतर नागपूर व नाशिकचा क्रमांक लागतो.
नागरिकांना मिळणार जलद सेवा
ठाणे जिल्हा परिषदेच्या या यशाचे थेट फायदे ग्रामीण भागातील नागरिकांना मिळणार आहेत. डिजिटल प्रशासन बळकट झाल्यामुळे आता विविध दाखले, योजनांचे लाभ आणि तक्रार निवारण अधिक सुलभ, जलद व प्रभावीपणे पार पडणार आहे. यामुळे प्रशासनावरील ताण कमी होऊन लोकाभिमुख कारभाराला चालना मिळाली आहे.
यशाची परंपरा कायम
१०० दिवसांच्या कार्यक्रमातही होता प्रथम क्रमांक. ठाणे जिल्हा परिषदेने यापूर्वीही मुख्यमंत्री १०० दिवस कृती कार्यक्रमात (७ जानेवारी ते १६ एप्रिल) राज्यात प्रथम क्रमांक मिळवून आपली मोहर उमटवली होती. त्या वेळी कार्यालयीन स्वच्छता, डिजिटलायझेशन, कर्मचाऱ्यांची आसन व्यवस्था आणि तक्रार निवारण यांसारख्या १० निकषांवर जिल्ह्याने अव्वल स्थान राखले होते. आता ई-गव्हर्नन्समध्येही तिसरा क्रमांक मिळवून जिल्ह्याने आपला हायटेक दर्जा सिद्ध केला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.