

कुवेतमध्ये नोकरीचे प्रलोभन दाखवून २२ जणांना १५ लाखांचा गंडा
भिवंडीत खोटा व्हिसा आणि बनावट करारनामा देऊन फसवणूक, दोन महिलांचाही समावेश
भिवंडी, ता. १० (बातमीदार) ः कुवेत देशातील नामांकित ‘मरिना मॉल’मध्ये हेल्परची नोकरी लावण्याचे प्रलोभन दाखवून भिवंडीतील २२ तरुणांना १५ लाख ३४ हजार रुपयांना लुटल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी भिवंडी शहर पोलिसांनी चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, त्यामध्ये दोन महिलांचा समावेश आहे.
शहरातील धामणकर नाका परिसरातील सिटी सेंटर मॉलमध्ये ‘अल्फा इंटरप्रायजेस’ नावाचे कार्यालय थाटून आरोपींनी बेरोजगारांना जाळ्यात ओढले. कुवेतमध्ये चांगल्या पगाराची नोकरी मिळेल, असे प्रलोभन दाखवून २२ जणांकडून प्रत्येकी हजारो रुपये रोख आणि ऑनलाइन स्वरूपात जमा केले. विश्वास संपादन करण्यासाठी आरोपींनी या तरुणांना परदेशातील नोकरीचा खोटा करारनामा आणि बनावट व्हिसादेखील दिला.
काही दिवस उलटल्यानंतरही नोकरीबाबत कोणतीच हालचाल न झाल्याने संशय बळावला. जैतुनपुरा येथील अफसर रमजान अन्सारी (३३) या यंत्रमाग कामगाराने पाठपुरावा केला असता, आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. अन्सारी यांनी इतर २१ पीडितांसह शहर पोलिस ठाणे गाठून तक्रार दिली.
पोलिसांची कारवाई
मिळालेल्या तक्रारीवरून पोलिसांनी संजयकुमार रतनकुमार, आयान आणि दोन अनोळखी महिलांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. या टोळीने आणखी किती जणांची फसवणूक केली आहे, याचा शोध पोलिस घेत आहेत. सहाय्यक पोलिस निरीक्षक संतोष तपासे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.