साडेसहा दशकांचा लालबावटा इतिहासजमा

साडेसहा दशकांचा लालबावटा इतिहासजमा
Published on

वसंत जाधव : सकाळ वृत्तसेवा
पनवेल, ता. १० : साडेसहा दशकांहून अधिक काळ पनवेल तालुक्यावर निर्विवाद वर्चस्व राखणाऱ्या शेतकरी कामगार पक्षाचा (शेकाप) ग्रामीण पनवेलमधील अभेद्य समजला जाणारा गड अखेर कोसळला आहे. नुकत्याच पार पडलेल्या रायगड जिल्हा परिषद आणि पनवेल पंचायत समिती निवडणूक निकालांमधून शेकापची पूर्णपणे वाताहत झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्या जागी भाजपने आपला नवा आणि भक्कम राजकीय बालेकिल्ला उभा केला आहे.

विधानसभा निवडणूक, त्यानंतर पनवेल महापालिका आणि आता जिल्हा परिषद व पंचायत समिती, अशा सलग निवडणुकांमध्ये मिळालेल्या दणदणीत यशामुळे भाजपने शेकापला चारही बाजूंनी घेरत निर्णायक पराभव दिला आहे. या राजकीय उलथापालथीमागे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली भाजपने उभारलेली मजबूत संघटनात्मक बांधणी निर्णायक ठरल्याचे चित्र आहे. एकेकाळी लालबावट्याचा किल्ला मानला जाणारा पनवेल आज भाजपचा अभेद्य बालेकिल्ला बनला असून, हा बदल केवळ निवडणूक निकालापुरता मर्यादित न राहता पनवेलच्या राजकीय इतिहासातील एक मोठा टर्निंग पॉइंट ठरत आहे.

शेकापचा बालेकिल्ला कसा ढासळत गेला?
शेकाप हा महाराष्ट्रातील अत्यंत जुना आणि एकेकाळचा प्रभावी विरोधी पक्ष मानला जातो. पनवेल तालुक्यात ग्रामपंचायतीपासून ते लोकसभा निवडणुकीपर्यंत खटारा चिन्हाला दीर्घकाळ जनतेचा पाठिंबा लाभला होता. माजी खासदार दि. बा. पाटील आणि रामशेठ ठाकूर यांच्यासारख्या दिग्गज नेत्यांनी लोकसभेत पनवेलचे प्रतिनिधित्व केल्यामुळे पनवेल ही शेकापची कर्मभूमी आणि अभेद्य बालेकिल्ला मानली जात होती. मात्र, २००४ मध्ये रामशेठ ठाकूर यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर पनवेलच्या राजकारणात निर्णायक वळण आले. २००६ मध्ये पनवेल नगर परिषद भाजपने जिंकली आणि २००९ मध्ये आमदार प्रशांत ठाकूर यांच्या रूपाने पनवेलला पहिल्यांदाच बिगर-शेकाप आमदार मिळाला. याच टप्प्यावर जवळपास ५० वर्षे अबाधित असलेल्या शेकापच्या सत्तेला तडे जाऊ लागले.

शहरीकरण आणि बदलती लोकसंख्या
पनवेल परिसरात वेगाने झालेले शहरीकरण, औद्योगिक विस्तार आणि स्थलांतरित लोकसंख्येचा वाढता प्रभाव यामुळे शेकापची पारंपरिक ग्रामीण मतपेढी हळूहळू कमी होत गेली. दुसरीकडे, आमदार प्रशांत ठाकूर गेल्या चार टर्मपासून मतदारसंघाचे नेतृत्व करत असून, भाजपने ग्रामीण ते शहरी भागात सातत्याने संघटन मजबूत केली.

पालिकेपासून पंचायत समितीपर्यंत भाजपचा झंझावात
२०१७ आणि २०२६ या दोन्ही निवडणुकांत पनवेल महापालिकेवर भाजपने सत्ता प्रस्थापित केली. नुकत्याच पार पडलेल्या महापालिका निवडणुकीत शेकापला केवळ नऊ जागांवर समाधान मानावे लागले. त्यानंतर लागलेल्या पंचायत समिती निकालांनी तर शेकापसाठी धक्कादायक चित्र उभे केले. १६ पैकी १५ जागा जिंकत भाजपने पंचायत समितीवरील लाल बावटा खाली उतरवला.

जिल्हा परिषदेतही शेकापचा अस्त
जिल्हा परिषद निवडणुकीत पनवेल तालुक्यातील आठही गटांमध्ये भाजपने बाजी मारली. आतापर्यंत पनवेल तालुक्यातून सर्वाधिक जागा देत शेकाप अलिबागच्या राजकारणाला बळ देत होता. मात्र, यंदा भाजपने पनवेलमधून शंभर टक्के जागा जिंकत रायगड जिल्हा परिषदेत ‘किंगमेकर’ची भूमिका मिळवली आहे.
विशेष म्हणजे, संपूर्ण रायगड जिल्ह्यात शेकापला एकही जिल्हा परिषद सदस्य निवडून आणता आला नाही, तसेच पंचायत समितीवरही सत्ता मिळवता आली नाही. या निकालांमुळे शेकापची ग्रामीण राजकारणातील पकड मोठ्या प्रमाणात ढासळली असून, पक्षाच्या भविष्यातील वाटचालीबाबत गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com