

हत्तीरोगाविरोधात आशागडमधून मोहीम
पालघर (बातमीदार)ः राष्ट्रीय हत्तीरोग नियंत्रण कार्यक्रम (एमडीए) अंतर्गत हत्तीरोगविरोधी एक दिवसीय औषधोपचार मोहिमेचा शुभारंभ आज प्राथमिक आरोग्य केंद्र आशागड येथे आमदार विनोद निकोले यांच्या हस्ते करण्यात आला. या वेळी त्यांनी स्वतः औषधांचे सेवन करून नागरिकांना मोहिमेत सक्रिय सहभाग नोंदविण्याचे आवाहन केले. या कार्यक्रमास सोगवे गावच्या सरपंच लहानी दौडा, आशागड येथील ग्रामपंचायत सदस्य, प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. गणेश पांचाळ, डॉ. प्रिया तिवारी, आरोग्य कर्मचारी तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. डासांमुळे पसरणारा व दीर्घकालीन अपंगत्व निर्माण करणारा गंभीर सार्वजनिक आरोग्याचा प्रश्न असल्याने त्याचा प्रतिबंध करणे अत्यंत आवश्यक असल्याचे या वेळी सांगण्यात आले. या मोहिमेदरम्यान निवडलेल्या तालुक्यांमध्ये डीईसी, अल्बेन्डाझोल व आयव्हरमेक्टिन ही तीन औषधे एकत्रित दिली जाणार असून, ती बूथवर तसेच आरोग्य कर्मचाऱ्यांमार्फत घरोघरी जाऊन वितरित केली जाणार आहेत. दोन वर्षांखालील मुले, गर्भवती महिला व गंभीर आजार असलेल्या व्यक्तींना ही औषधे दिली जाणार नाहीत.
------------------------------------------
शासकीय जमिनीवरील अतिक्रमणावर हातोडा
पालघर ः केळवे येथील सरकारी जागेवरील अतिक्रमण महसूल आणि पोलिस विभागाच्या संयुक्त कारवाईने जमीनदोस्त करण्यात आले. केळवे सर्व्हे क्रमांक ११५१ मधील शासकीय जागेवर हे अनधिकृत बांधकाम होते. स्वातंत्र्य सैनिकांसाठी ही जमीन राखीव होती. या जागेवर विनोद मिश्रा यांनी तबेल्यासाठी शेड तसेच काही खोल्यांचे बांधकाम केल्याचे निदर्शनास आल्यानंतर प्रशासनाने कारवाई करत अंदाजे अडीच ते तीन एकर क्षेत्र अतिक्रमणमुक्त केले. सरकारी जमिनीवरील अतिक्रमण तातडीने हटविण्याच्या सूचना राज्य शासनाच्या आहेत. जिल्हा पातळीवर जिल्हाधिकारी, उपविभागीय महसूल अधिकारी आणि तहसीलदार यांची समिती यासाठी कार्यरत आहे. त्यानुसार माहीमचे मंडळ अधिकारी मनोहर वसावे, केळवा तलाठी शिराज शेख, माहीम तलाठी दिनेश पाटील, केळवा रोड तलाठी अश्विनी भुसारा, मायकोप तलाठी प्रज्ञा शिंदे आणि वडारई तलाठी भाग्यश्री पाटील यांच्या पथकासह पोलिस विभागाच्या कर्मचाऱ्यांनी अतिक्रमणावर कारवाई केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.