

पाम बीच मार्गावरील अपघातांची संख्या वाढली
अपघातग्रस्त प्रवाशांसाठी रुग्णवाहिका तैनात करण्याची मागणी
बेलापूर, ता. १० (बातमीदार) ः नवी मुंबई शहराच्या सौंदर्यात भर टाकणारा पाम बीच मार्ग जितका सुसज्ज, सोयीस्कर आहे तितकाच तो प्राणघातक ठरत आहे. दर दोन दिवसांआड पामबीच मार्गावर लहान-मोठे अपघात घडत असून, यामध्ये कोणी गंभीर जखमी होत आहेत, तर काहींचे जागीच मृत्यू होत आहेत. बहुतांशवेळा पाम बीच मार्गावर अपघातात जखमी झालेल्यांना तत्काळ रुग्णालयात नेण्यासाठी रुग्णवाहिका उपलब्ध नसल्याने उपचार मिळण्यास विलंब होण्याचे प्रकार घडत आहेत. याच पार्श्वभूमीवर पाम बीच मार्गावरील सर्व मुख्य सिग्नलजवळ रुग्णवाहिका तैनात करण्याची मागणी रोड सेफ्टी संघटना आणि नागरिक करीत आहेत.
नवी मुंबईतील पाम बीच मार्गावर अपघातांचे प्रमाण वाढल्याने प्रवाशांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. या मार्गावर ६० किमी प्रतितास अशी अधिकृत वेगमर्यादा असतानाही अनेक वाहनचालक नियम धाब्यावर बसवून अतिवेगाने वाहन चालवत आहेत. अशा बेजबाबदार चालकांमुळे रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांचा जीव धोक्यात आला आहे. पाम बीच मार्गावर विशेषतः रात्रीच्या वेळी वेगाचा कहर अधिकच वाढत असताना आता दिवसाढवळ्यादेखील अपघाताच्या घटना घडत आहेत. अनेक ठिकाणी भरधाव वाहनचालकांकडून स्टंटबाजी, सिग्नल तोडणे, अचानक लेन बदल, रेसिंग यासारखे प्रकार सर्रास घडत असून, यामुळे अपघातांचे प्रमाण वाढत आहे. वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत असून, या मार्गांवर कडक वेगमर्यादेची अंमलबजावणी, स्पीड कॅमेरे, सीसीटीव्ही आणि रात्रीच्या वेळी पोलिस गस्त वाढवण्याची मागणी जोर धरू लागली आहे. दुसरीकडे अपघातात जखमी झालेल्या चालकांना वेळीच उपचार देण्यासाठी रुग्णवाहिका उपलब्ध होत नसल्याने रिक्षा अथवा एखादे वाहन थांबवून रुग्णालय गाठावे लागत आहे. परिणामी पाम बीच मार्गावर असणाऱ्या सर्व मुख्य सिग्नलजवळ रुग्णवाहिका तैनात कराव्यात, जेणेकरून अपघातग्रस्तांना पुढील उपचारासाठी वेगाने रुग्णालयात दाखल करता येईल, अशी मागणी रोड सेफ्टी संघटनेचे प्रमुख विनय मोरे यांच्याकडून करण्यात येत आहे.
अलीकडे झालेल्या अपघाताच्या घटना
१० फेब्रुवारी
नेरूळ ते सानपाडा - रिक्षा आणि कारचालक गंभीर जखमी
३ फेब्रुवारी
एनआरआय सिग्नलपुढे एका ३० वर्षीय दुचाकीस्वाराचा अपघाती मृत्यू
२७ मे
मध्यरात्री माजी नगरसेवकाच्या कारला अपघात. चालकासह प्रवासी जखमी
गेल्या तीन वर्षांत पामबीच मार्गावरील प्राणघातक अपघातांत घट झाल्याचा दावा वाहतूक पोलिसांकडून करण्यात आला आहे; मात्र तसे दिसून येत नाही. दररोज अपघात घडत असून कारवाईसोबत अपघातग्रस्तांना तत्काळ उपचार मिळण्याकरिता या मार्गावर रुग्णवाहिका तैनात असणे अत्यंत गरजेचे आहे. एखादा जीव त्यामुळे नक्कीच वाचू शकतो.
- यश विश्वकर्मा, समाजसेवक
आपण स्पीड कॅमेरे, सीसीटीव्ही जागोजागी बसवले आहेत. वेगाने वाहने चालवू नका, असे आवाहनदेखील करीत आहोत. सिग्नलनजीक रुग्णवाहिका तैनात करण्याबाबत वाहतूक विभाग, महापालिका, वरिष्ठांशी चर्चा करण्यात येईल.
- देवेंद्र पोळ, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, एनआरआय सागरी पोलिस ठाणे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.