दादरच्या पदपथांनी घेतला मोकळा श्वास
दादरच्या पदपथांनी घेतला मोकळा श्वास
प्रभादेवी, ता. १२ : दादर परिसरातील पदपथांवरील अतिक्रमण हटविण्याच्या मोहिमेला यश आल्यानंतर परिसरातील पदपथांनी अखेर मोकळा श्वास घेतला आहे. महापालिकेच्या अतिक्रमण नियंत्रण विभागाने पोलिसांच्या मदतीने राबविलेल्या विशेष कारवाईत दादर स्थानक परिसरातील अनेक अनधिकृत स्टॉल आणि फेरीवाल्यांना हटविण्यात आले.
दादर पश्चिम व पूर्व भागात, विशेषतः रेल्वे स्थानक परिसर, कबुतरखाना, रानडे रोड आणि एन. सी. केळकर मार्ग येथील पदपथांवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले होते. परिणामी पादचाऱ्यांना रस्त्यावरून चालावे लागत होते. फेरीवाल्यांमुळे वाहतूक कोंडी वाढत असल्याने नागरिकांकडून वारंवार तक्रारी करण्यात येत होत्या.
महापालिकेने विशेष मोहीम राबवून पदपथ मोकळे केले. दादर स्थानक परिसरात भाजी व फळविक्रेते ठाण मांडून बसत असल्याने पादचाऱ्यांची गैरसोय होत होती. कारवाईदरम्यान तेथील पदपथ पूर्णतः मोकळे करण्यात आले. तसेच केशवसुत उड्डाणपुलाखाली फेरीवाले पुन्हा बसू नयेत, यासाठी स्टीलचे बॅरिकेड्स बसविण्यात आले आहेत.
परिसरात अनधिकृत ठेले वाढल्याबाबत स्थानिक पातळीवरही नाराजी व्यक्त करण्यात येत होती. यापूर्वी काही लोकप्रतिनिधींनीही फेरीवाल्यांविरोधात मोहीम राबविली होती. पदपथ मोकळे झाल्यामुळे ज्येष्ठ नागरिक, महिला आणि शालेय विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. आता सुरक्षितपणे चालता येत आहे, अशी प्रतिक्रिया स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली. दरम्यान, पुन्हा अतिक्रमण होऊ नये यासाठी नियमित पाहणी आणि कडक कारवाई केली जाईल, असे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. पदपथ मोकळे ठेवण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

