

शहापूरची तहान वाढली
भातसा नदीवर आधारित नव्या पाणीपुरवठा योजनेची मागणी; आमदार निरंजन डावखरे यांचे निवेदन
ठाणे, ता. १२ : शहापूर नगर पंचायत क्षेत्रातील वाढती लोकसंख्या आणि भविष्यातील गरजा लक्षात घेता, १९८३ मधील जुनी पाणीपुरवठा योजना आता कालबाह्य ठरली आहे. नागरिकांना नियमित आणि स्वच्छ पाणी मिळण्यासाठी भातसा नदी या स्रोतावर आधारित नवी सक्षम पाणीपुरवठा योजना तातडीने मंजूर करावी, अशी मागणी कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार ॲड. निरंजन डावखरे यांनी राज्य सरकारकडे केली आहे.
आमदार डावखरे यांनी निवेदनात नमूद केले, की शहापूर नगर पंचायतीची स्थापना झाल्यापासून शहराचा विस्तार झपाट्याने होत आहे. सध्या कार्यान्वित असलेली योजना चार दशकांपूर्वीची असल्याने ती आजच्या वाढत्या वसाहतींना पाणी पुरवण्यास असमर्थ ठरत आहे. २०४४ पर्यंतची संभाव्य लोकसंख्या विचारात घेऊन दीर्घकालीन नियोजन करणे आता अनिवार्य झाले आहे.
प्रस्तावित योजनेचे महत्त्व
भातसा नदीवर आधारित स्वतंत्र योजना कार्यान्वित झाल्यास शहापूरकरांना पुरेसे आणि शुद्ध पाणी मिळेल. तसेच सक्षम पाणीपुरवठा व्यवस्थेमुळे शहराच्या नियोजित नागरी विकासाला वेग येईल. त्यामुळे शहापूरचा विकास वेगाने होत असताना पाणीपुरवठ्यासारखी मूलभूत सुविधा जुन्या तंत्रज्ञानावर अवलंबून राहणे चुकीचे आहे. शासनाने लोकहिताचा हा प्रस्ताव तातडीने मार्गी लावावा, अशी मागणी आमदार ॲड. निरंजन डावखरे यांनी केली.
आरक्षणाचा प्रस्ताव प्रलंबित
नगरपंचायतीने यापूर्वीच आवश्यक ठराव करून पाणी आरक्षणाचा प्रस्ताव शासनाकडे पाठवला आहे. काही खासगी प्रकल्पांचे आरक्षण रद्द झाल्यामुळे उपलब्ध झालेले २.५७ दलघमी प्रति वर्ष इतके पाणी शहापूर नगर पंचायतीला देण्याचा प्रस्ताव सध्या मंत्रालयात प्रलंबित आहे. हा प्रस्ताव तातडीने मंजूर करून प्रशासकीय कार्यवाही सुरू करण्याची मागणी डावखरे यांनी केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.