मुंबईच्या धर्तीवर ‘ठाणे शहर विकास समिती’
मुंबईच्या धर्तीवर ‘ठाणे शहर विकास समिती’
- उपमहापौर कृष्णा पाटील यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १२ : झपाट्याने वाढणाऱ्या ठाणे शहराच्या नियोजनबद्ध आणि पारदर्शक विकासासाठी मुंबई महापालिकेच्या धर्तीवर ‘ठाणे शहर विकास समिती’ स्थापन करण्यात यावी, अशी मागणी ठाणे महापालिकेचे उपमहापौर कृष्णा पाटील यांनी राज्य सरकारकडे केली आहे. यासंदर्भात त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच उपमुख्यमंत्री व नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना लेखी निवेदन पाठविले आहे.
ठाण्याचा वाढता विस्तार, वाढती लोकसंख्या आणि गुंतागुंतीच्या नागरी समस्या लक्षात घेता स्वतंत्र तज्ज्ञ समितीची गरज निर्माण झाली असल्याचे पाटील यांनी पत्रात नमूद केले आहे. केवळ उंच इमारती उभारण्यापेक्षा सर्वसामान्य ठाणेकरांना केंद्रस्थानी ठेवून विकास आराखड्याची अंमलबजावणी होणे आवश्यक असल्याचा उल्लेख त्यांनी केला आहे.
मुंबई महापालिकेत शहर विकासासाठी कार्यरत असलेल्या विशेष समितीप्रमाणेच ठाण्यातही तज्ज्ञ, प्रशासन आणि लोकप्रतिनिधींचा समावेश असलेली समिती स्थापन करावी, अशी त्यांची मागणी आहे. या समितीमार्फत शहराच्या विकास आराखड्यावर (डीपी) बारकाईने लक्ष ठेवून त्याची पारदर्शक अंमलबजावणी करणे, बिल्डरधार्जिण्या निर्णयांना आळा घालणे, सर्वसामान्यांसाठी गृहनिर्माण धोरणे प्रभावीपणे राबविणे आणि विकास विभागातील भ्रष्टाचाराला लगाम लावणे शक्य होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
-----------------------
याशिवाय अनधिकृत बांधकामे, फेरीवाल्यांचे अतिक्रमण, वाढती वाहतूक कोंडी यासारख्या ज्वलंत प्रश्नांवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी ही समिती महत्त्वाची भूमिका बजावू शकेल, असे पत्रात नमूद आहे. नागरी सोयी-सुविधांचा दर्जा उंचावून ठाणेकरांच्या जीवनमानात सुधारणा करण्यावर भर देण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली आहे. राज्य सरकारने या मागणीची गांभीर्याने दखल घेऊन तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा उपमहापौर पाटील यांनी व्यक्त केली आहे. या निवेदनाची प्रत पुढील कार्यवाहीसाठी महापालिका आयुक्तांनाही पाठविण्यात आली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

