

उन्हाळी शेतीला बहर
वसई पूर्व परिसरात पालेभाज्यांसह फळपिकांची लगबग
वज्रेश्वरी, ता. ११ (बातमीदार) : यंदा समाधानकारक पावसाने हजेरी लावल्याने परिसरातील शेतकऱ्यांसाठी उन्हाळी शेतीसाठी अनुकूल वातावरण निर्माण झाले आहे. मागील काही वर्षापासून पाण्याच्या टंचाईमुळे अडचणीत सापडलेली उन्हाळी शेती यंदा मात्र नव्या आशेने बहरताना दिसत आहे. पावसाचे प्रमाण अपेक्षेपेक्षा चांगले राहिल्याने विहिरी, तलाव आणि पाणीसाठ्यांमध्ये पुरेसा जलसाठा उपलब्ध झाला असून त्याचा थेट फायदा शेतीला होत आहे.
वसई पूर्वेतील सातीवली, गोखिवरे, वालीव, फादरवाडी, चिंचपाडा, पेल्हार आदी ग्रामीण भागात शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर उन्हाळी पिकांची लागवड सुरू केली आहे. भाजीपाला पिके भेंडी, दोडका, कारले, वांगी, मिरची, काकडी आणि टरबूज, खरबूज यांसारख्या फळपिकांकडे शेतकऱ्यांचा कल वाढताना दिसत आहे. पाण्याची उपलब्धता असल्याने पिकांची वाढही चांगली होत असून उत्पादनात वाढ होण्याची शक्यता शेतकरी व्यक्त करत आहेत.
गेल्या काही दिवसांत पडलेल्या पावसामुळे जमिनीत आवश्यक ओलावा टिकून राहिला आहे. त्यामुळे सिंचनासाठी होणारा खर्चही काही प्रमाणात कमी झाला असून शेतकऱ्यांचा आर्थिक भार हलका झाला आहे. विशेषतः लहान व मध्यम शेतकऱ्यांना याचा मोठा फायदा होत आहे. वेळेवर पिकांना पाणी मिळत असल्याने पीक रोगराईपासून वाचण्यास मदत होत असून उत्पादनची गुणवत्ता सुधारत आहे.
दरम्यान, बाजारपेठेत उन्हाळी भाजीपाल्याला चांगली मागणी असल्याने शेतकऱ्यांना योग्य दर मिळण्याची अपेक्षा आहे. यंदाचा हंगाम चांगला जावा उत्पादन खर्च निघून नफा मिळावा, अशी अपेक्षा शेतकरी करीत आहे. उन्हाळी शेतीसाठी सकारात्मक वातावरण निर्माण झाले असून शेतकऱ्यामध्ये समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.