नेरूळमध्ये स्टॉलधारकांकडून पदपथावर अतिक्रमण
जुईनगर, ता. १२ (बातमीदार) : नवी मुंबई महापालिकेच्या मालमत्ता विभागामार्फत नेरूळ सेक्टर १८ परिसरात आर्थिकदृष्ट्या दुर्बल व गरजू नागरिकांना उपजीविकेसाठी देण्यात आलेल्या स्टॉलपैकी एका स्टॉलचा वापर सध्या भाजीपाला विक्रीसाठी होत आहे. संबंधित विक्रेत्याकडून पदपथावर अतिक्रमण केल्याची तक्रार स्थानिक नागरिकांनी केली आहे. या अतिक्रमणामुळे पादचाऱ्यांना ये-जा करताना अडथळे निर्माण होत असून विशेषतः ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी आणि महिलांना गैरसोयीचा सामना करावा लागत असल्याचे रहिवाशांचे म्हणणे आहे.
संबंधित विक्रेता भाजीपाल्याचे कॅरेट आणि माल स्टॉलच्या बाहेर पदपथावर ठेवत असल्याने पदपथाचा मार्ग अरुंद झाला आहे. काही नागरिकांनी त्याला कॅरेट मागे घेण्याची विनंती केली असता अरेरावीची भाषा वापरत ‘रस्त्यावरून जा’, असा अजब सल्ला हा विक्रेता नागरिकांना देत आहे. या प्रकारामुळे परिसरातील नागरिक प्रचंड संताप व्यक्त करीत आहेत.
महापालिकेने गरजूंसाठी दिलेल्या स्टॉलचा उद्देश रोजगार उपलब्ध करून देणे असला तरी सार्वजनिक जागेवर अतिक्रमण करणे नियमबाह्य आहे. शिवाय, पदपथावर अतिक्रमण करून हे लोक महापालिका अतिक्रमण विभागाला मोठे आव्हान देत असल्याचे दिसून येत आहे. संबंधित विभागाने याची दखल घेऊन संबंधित विक्रेत्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी होत आहे.
शहरातील पदपथ हे पादचाऱ्यांसाठी असतात आणि त्यावर अतिक्रमण झाल्यास नागरिकांना अपघाताचा धोका स्वीकारून रस्त्यावरून चालणे सक्तीचे होत आहे. त्यामुळे आता महापालिका अतिक्रमण विभागाच्या कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
संबंधितांचे दुर्लक्ष
याबाबत प्रशासकीय प्रतिक्रिया घेण्यासाठी नेरूळ विभाग कार्यालयात विभाग अधिकारी यांच्या ८९७६९५४८८२ या क्रमांकावर संपर्क केला असता दिवसभर फोन क्रमांक बंद असल्याचे सांगण्यात आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

