काेरियन वेव्‍ह

काेरियन वेव्‍ह

Published on

आभासी सुखाचा मृत्यूमार्ग
---
इंट्राे
कोरियन संस्कृतीचा भारतीय मनावर पडलेला प्रभाव हा केवळ ट्रेंड नसून तो सांस्कृतिक अतिरेक आहे. गाझियाबादमध्ये तीन मुलींनी मोबाईल वापराच्या निर्बंधांमुळे टोकाचे पाऊल उचलणे ही ‘डिजिटल फॅंडम’ युगातील गंभीर संकटाची नांदी आहे. ही घटना मोबाईल किंवा कोरियन कंटेंटपुरती मर्यादित नाही, तर किशोरवयीन मुलांच्या वास्तव जगाची जागा आभासी जगाने घेतल्याचे निदर्शक आहे. आभासी सुखाची अनुभूतीच त्यांच्यासाठी मृत्युमार्ग ठरत आहे.
------------
‘हॅल्यू’ किंवा कोरियन वेव्ह भारतीय घराघरांत प्रभावी ठरण्याचे मुख्य कारण म्हणजे सांस्कृतिक साधर्म्य. पाश्चात्त्य संस्कृतीतील अतिस्वच्छंदतेपेक्षा, कोरियन नाटकांमध्ये दिसणारी कुटुंबव्यवस्था, वडीलधाऱ्यांचा आदर आणि त्यागाची भावना भारतीय प्रेक्षकांना आपलीशी वाटते. ‘हॅल्यू’ (Hallyu) प्रभावामुळे गेल्या पाच वर्षांत भारतात कोरियन भाषा शिकणाऱ्यांच्या संख्येत ७५% पेक्षा जास्त वाढ झाली आहे. नेटफ्लिक्सच्या २०२३च्या आकडेवारीनुसार, ६० टक्क्यांहून अधिक भारतीय प्रेक्षक कोरियन कंटेंटला पसंती देत आहेत. त्यामुळे ही एक ‘भावनिक गुंतवणूक’ बनली आहे. कोरियन रोमान्स आणि सिम्युलेशन गेम्स मुलांच्या भावनिक गरजा पूर्ण करण्याचा आभास निर्माण करतात. आवडत्या ‘आयडॉल्स’सारखे दिसण्यासाठी चाललेली धडपड आणि त्यांच्याशी संबंधित कंटेंट पाहण्याचे व्यसन हे अमली पदार्थांच्या व्यसनापेक्षाही धाेकादायक बनले आहे. मुलांच्या हातातून अचानक माेबाईल हिरावून ही समस्या सुटणार नाही. त्यासाठी पालकांना सुसंवादाचा सेतूच मुलांना या मृत्युमार्गापासून दूर नेण्यास उपयुक्त ठरू शकेल.


सांस्कृतिक आणि जीवनशैलीवरील प्रभाव
- कोरियन गाणी आणि वेबसीरिजमुळे भारतीय मुलांत कोरियन भाषा (हंगूल) शिकण्याचे प्रमाण वाढले आहे. ‘अन्नियोनघासेयो’ (नमस्कार) किंवा ‘सारंगहे’ (प्रेम) यांसारखे शब्द मुलांच्या संभाषणात सहज ऐकायला मिळतात.
- भारतीय कौटुंबिक मूल्यांचे साधर्म्यामुळे मुलांना ही संस्कृती आपलीशी वाटते. अनेक कोरियन ड्रामामध्ये कुटुंब, थोरामोठ्यांचा आदर आणि भावनिक नातेसंबंधांना महत्त्व दिले जाते.
- सौंदर्य आणि त्वचा निगा (के-ब्युटी) यांचा प्रभाव वाढत आहे. ग्लास स्किनची क्रेझ वाढल्याने मुले कोरियन स्किनकेअर उत्पादनांकडे वळली आहेत.
- ओव्हरसाईज टी-शर्ट्स, पेस्टल रंगांचे कपडे आणि कोरियन हेअरस्टाइलचे अनुकरण मोठ्या प्रमाणावर केले जात आहे.
----
नकारात्मक परिणाम
- कोरियन संस्कृतीच्या अतिवेडामुळे मुले अभ्यासाकडे दुर्लक्ष करत आहेत.
- सतत कोरियन ड्रामा पाहिल्यामुळे मुले वास्तवापेक्षा एका काल्पनिक ‘परफेक्ट’ जगात रमू लागतात.
- आपल्या आवडत्या कोरियन स्टार्सशी आपले काहीतरी खास नाते आहे, अशा भ्रमात (पॅरासोशल रिलेशनशिप) मुले राहतात. मानसिक आरोग्यासाठी हे हानिकारक ठरते.
-----
टास्क-बेस्ड गेम्समुळे धाेका काय?
- मुलांना सायबर बूलिंग आणि ब्लॅकमेलिंगसारख्या प्रकारांना सामाेरे जावे लागू शकते. अनेक टास्क-बेस्ड गेम्समध्ये खेळाडूची वैयक्तिक माहिती गोळा केली जाते. टास्क पूर्ण न केल्यास ती माहिती सार्वजनिक करण्याची किंवा कुटुंबीयांना इजा पोहोचवण्याची धमकी दिली जाते.
- हे गेम्स खेळणारी मुले हळूहळू मित्र आणि कुटुंबापासून दुरावतात. सततच्या अपयशाच्या भीतीमुळे किंवा खेळातील हिंसक वळणामुळे मुले नैराश्यात जातात.
- मुले चिडचिडी होतात. त्यांना झोप न येणे आणि सतत भीती वाटणे, यांसारखे त्रास जाणवू लागतात.
- काही गेम्समध्ये सुरुवातीला सोपी टास्क दिली जातात; पण हळूहळू ती हिंसक वळणावर जातात.
- तासन्‌तास स्क्रीनसमोर बसल्याने दृष्टी कमकुवत होणे आणि शारीरिक हालचालींच्या अभावामुळे लठ्ठपणा वाढतो.
----
धाेकादायक टास्क-बेस्ड गेम
- ब्लू व्हेल चॅलेंज : या गेममध्ये ५० दिवसांचे ५० टास्क दिले जात असत. ज्यातील शेवटचा टास्क ‘आत्महत्या’ करणे हा होता. भारतात आणि रशियात या गेममुळे शेकडो मुलांनी जीव दिला.
- मोमो चॅलेंज : व्हॉट्सॲपच्या माध्यमातून पसरलेल्या या चॅलेंजमध्ये मुलांना अज्ञात नंबरवरून मेसेज पाठवून धोकादायक कृत्ये करण्यास प्रवृत्त केले जात हाेते.
- ब्लॅकआऊट चॅलेंज : सोशल मीडियावर (विशेषतः टिकटॉकवर) लोकप्रिय झालेल्या या चॅलेंजमध्ये स्वतःचा श्वास रोखून धरण्यास सांगितले जात असे. यामुळे मेंदूला ऑक्सिजन न मिळाल्याने अनेक मुलांचा मृत्यू झाला आहे.
- बेनाड्रिल चॅलेंज : ठरावीक औषधांचे अतिसेवन करून त्याचे परिणाम व्हिडिओमध्ये दाखवण्याचे हे चॅलेंज मुलांच्या जीवावर बेतू शकते.
- बर्ड बॉक्स चॅलेंज : डोळ्यावर पट्टी बांधून रस्ता ओलांडणे किंवा गाडी चालवणे यांसारखे जीवघेणे टास्क यात दिले जातात.

मुले या खेळांकडे का आकर्षित होतात?
- मित्रांमध्ये आपला वेगळा प्रभाव पाडण्यासाठी किंवा धाडसी असल्याचे सिद्ध करण्यासाठी मुले हे टास्क करतात.
- एखादे अवघड टास्क पूर्ण केल्यावर मिळणारा आनंद आणि सोशल मीडियावर मिळणारे ‘लाइक्स’ यामुळे मुलांना याची सवय लागते.
- पुढच्या टास्कच्या कुतूहलापोटी मुले जाळ्यात अडकतात.
------------------------
पालकांसाठी सावधगिरीचे उपाय
- मुलांना ठरावीक वेळेपेक्षा जास्त काळ मोबाईल वापरू देऊ नका.
- मुलांच्या वागण्यात अचानक बदल दिसल्यास त्यांच्याशी प्रेमाने संवाद साधा.
- मुलांच्या मोबाईलवर फिल्टर आणि पॅरेंटल कंट्रोल ॲप्सचा वापर करा. त्यामुळे ते काय पाहत आहेत, यावर लक्ष ठेवता येईल.
- अनोळखी लिंकवर क्लिक न करणे किंवा अनोळखी व्यक्तींशी संवाद न साधणे, याबाबत मुलांना शिक्षित करा.
- तुम्हाला मुलाच्या वागण्यात बदल, हातावर जखमांच्या खुणा किंवा रात्री उशिरापर्यंत मोबाईलचा संशयास्पद वापर दिसत असेल, तर त्वरित तज्ज्ञांची मदत घ्या.

-----------
गेमशी संबंधित जगभरातील मृत्यू
- २०१६ मध्ये रशियातील एका वृत्तपत्राच्या दाव्‍यानुसार ब्लू व्हेल चॅलेंजमुळे नोव्हेंबर २०१५ ते एप्रिल २०१६ या कालावधीत १३० किशोरवयीन मुलांनी आत्महत्या केली. तपासात या सर्व मृत्यूंचा संबंध थेट गेमशी असल्याचे सिद्ध होऊ शकले नाही.
- या गेममुळे भारतात २०१७-१८ दरम्यान मुंबई, पश्चिम बंगाल आणि दक्षिण भारतातून अनेक संशयास्पद मृत्यूंच्या बातम्या आल्या होत्या. भारतात अनेक मुले या गेमच्या प्रभावाखाली आली होती; मात्र अधिकृत मृतांचा निश्चित आकडा तांत्रिकदृष्ट्या कठीण आहे.
- ब्लॅकआऊट चॅलेंज हा प्रामुख्याने टिकटॉक आणि इतर व्हिडिओ प्लॅटफॉर्मवर पसरला होता. एका वृत्तानुसार नोव्हेंबर २०२२ पर्यंत केवळ अमेरिकेत १२ वर्षांखालील किमान १५ मुलांचा या चॅलेंजमुळे मृत्यू झाला होता.
- मोमो चॅलेंजमुळे २०१८ मध्ये अर्जेंटिनातील एका १२ वर्षीय मुलीचा मृत्यू या चॅलेंजशी संबंधित असल्याचे वृत्त आले होते.
-----
लोकप्रिय कोरियन गेम
पबजी, समाेनर्स वाॅर, मॅपलस्टाेरी, कुकी रन : किंगडम, स्क्विड गेम, रोल-प्ले गेम्स
---

स्क्विड गेम चॅलेंजेस : नेटफ्लिक्सवरील स्क्विड गेम या सीरिजमध्ये लहान मुलांचे खेळ दाखवले होते. ज्याचा शेवट मृत्यूने होत हाेता. या सीरिजवर आधारित अनेक बेकायदा मोबाईल गेम आले आहेत. त्यामुळे लहान मुलांच्या मानसिकतेवर त्यांचा गंभीर परिणाम हाेऊ शकताे.

कोरियन थीम्स : डिस्काॅर्ड आणि टेलिग्राम चॅनेल्सच्या चॅट रूम्समध्ये ‘कोरियन आयडॉल्स’ (के-पाॅप स्टार्स)सारखे बनण्यासाठी मुलांना कठीण टास्क दिले जातात. वजन कमी करण्यासाठी उपवास करणे, रात्री उशिरापर्यंत जागे राहणे किंवा विशिष्ट प्रकारचे कपडे परिधान करणे, यांसारखे विविध चॅलेंज दिले जातात.
रोल-प्ले गेम्स : यात मुले कोरियन पात्रांचा मुखवटा धारण करून आभासी जगात जगतात आणि तिथल्या ‘मास्टर्स’कडून मिळणाऱ्या सूचनांचे पालन करतात.

यापासून सावधगिरी बाळगा
- तुमची वैयक्तिक माहिती (फोटो, पत्ता) मागत असेल.
- तुम्हाला एकटे राहण्यास किंवा घरच्यांपासून लपवून गेम खेळण्यास सांगत असेल.
- स्वतःला शारीरिक त्रास करून घेण्याचे टास्क देत असेल.
- पैसे किंवा गिफ्ट्सची मागणी करत असेल.
----
लोकप्रिय बॅँड
१. बीटीएस
२. ब्लॅकपिंक
३. एक्झो
४. स्ट्रॅय किड्स

मुले या बँड्सकडे का आकर्षित होतात?
- या म्युझिक बॅँडचे सादरीकरण भव्‍यदिव्‍य असते. संगीत आणि डान्स कोरिओग्राफी आणि म्युझिक व्हिडिओंचा दर्जा अत्यंत उच्च असतो.
- सोशल मीडियावर या बँड्सच्या गाण्यांचे डान्स चॅलेंजेस सतत व्हायरल होत असतात.
----

के-ड्रामाची भारतीयांना भुरळ का?
- भारतीय आणि कोरियन संस्कृतीत अनेक गोष्टींमध्ये साधर्म्य आहे. कोरियन ड्रामा (के-ड्रामा)मध्ये दाखवला जाणारा कुटुंबाचा आदर, थोरामोठ्यांचे स्थान, संस्कार आणि भावनिक नातेसंबंध भारतीय प्रेक्षकांना, विशेषतः पालकांना आणि मुलांना खूप जवळचे वाटतात.
- महिलांच्या दृष्‍टिकाेनाला केंद्रस्थान. पुरुषप्रधान मनाेरंजन क्षेत्रात महिलाप्रधान कंटेंट त्यांना भावते.
- बीटीएससारख्या बँड्सनी त्यांच्या गाण्यांमधून स्वतःवर प्रेम करण्याचा संदेश, तसेच मानसिक आरोग्य आणि तरुणांचा संघर्ष यावर भाष्य केले आहे. किशोरवयीन मुलांना तणावात आणि एकटेपणामुळे एक प्रकारचा भावनिक आधार मिळतो.
- कोरियन लोकांची त्वचा आणि त्यांची स्टाइल (ओव्हरसाइज कपडे, पेस्टल कलर्स) सध्याच्या इन्स्टाग्राम युगातील मुलांना खूप जवळची वाटते.
- नेटफ्लिक्स, यूट्युब आणि एमएक्स प्लेयर यांसारख्या प्लॅटफॉर्म्सनी कोरियन कन्टेंट मराठी आणि हिंदी डबिंगसह सहज उपलब्ध करून दिला आहे. यामुळे भाषेचा अडथळा दूर हाेऊन खेड्यापाड्यांत ही संस्कृती पोहोचली.
- नेटफ्लिक्स सर्व्हे २०२३नुसार काेरियन कंटेंट पाहणारे प्रेक्षक ६० टक्क्यांपेक्षा जास्त असून यूट्युब, इन्स्टाग्राम, एक्समध्ये कोरियन रील्सचा बाेलबाला
-----
खाद्यसंस्कृतीचे आकर्षण
सोशल मीडियावरील ‘मुकबांग’मुळे (खाण्याचे व्हिडिओ) भारतीय मुलांमध्ये रामेन, किमची आणि मोमोज (मांडू) यांसारख्या कोरियन पदार्थांची प्रचंड क्रेझ निर्माण झाली आहे.
------------------------------------------------------------------------------------
भारतातील के-वेव्ह (स्पॉटीफाय सर्व्हे २०२०)
- ईशान्य भारतातून सुरुवात
- भारतात २०१०नंतर के-पॉप, के-ड्रामा, ॲनिमेशनचा वेगाने प्रसार
- पीएसवायच्या गंगनम स्टाइलच्या व्‍हिडिओंनी प्रथमच यूट्युबवर एक अब्ज व्ह्यूज मिळवले
- कोविड-१९ काळात काेरियन वेव्‍हच्या लोकप्रियतेचा उच्चांक
- ‘बीटीएस’ बॅण्डचा फॅनबेस वाढला
- ‘लव्ह यूअरसेल्फ’ संकल्पनेची तरुणांना भुरळ
- ‘डायनामाइट’ बीटीएसचे पहिले इंग्रजी गाणे
------
भारतातील प्रमुख घटना
- मुंबईत जुलै २०१७ मध्ये अंधेरी येथे एका १४ वर्षीय मुलाने इमारतीच्या पाचव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. भारतात ‘ब्ल्यू व्हेल’मुळे झालेला हा पहिला संशयास्पद मृत्यू मानला जातो.
- पश्चिम बंगालमध्ये मिदनापूरमधील एका दहावीच्या विद्यार्थ्याने या गेममधील टास्क पूर्ण करण्यासाठी स्वतःचा चेहरा प्लॅस्टिक पिशवीने गुंडाळून आणि गळ्याला दोरी बांधून आत्महत्या केली हाेती.
- केरळमधील तिरुअनंतपुरममध्ये एका १६ वर्षीय मुलाने गळफास घेतला. त्याच्या आईने नंतर तो मोबाईलवर विचित्र टास्क पूर्ण करत होता आणि त्याने हातावर ब्लेडने अक्षरे कोरली होती.
- २०१८मध्ये राजस्थान आणि ओडिशामध्ये काही आत्महत्यांच्या घटना घडल्या. त्यांचा संबंध मोमो चॅलेंजशी जोडण्यात आला हाेता. या घटनात थेट पुरावा मिळाला नव्‍हता.
-----
दुर्घटनांमागील काही महत्त्वाची कारणे
- ओळख लपवून संवाद : हे गेम्स खेळवणारे ‘अ‍ॅडमिन्स’ मुलांची वैयक्तिक माहिती मिळवून त्यांना ब्लॅकमेल करतात.
- रात्रीचा वापर : मुले रात्रीच्या वेळी गुपचूप हे टास्क पूर्ण करतात. त्यामुळे पालकांना याची कल्पना येत नाही.
- ज्या मुलांशी घरात संवाद कमी असतो, ती मुले अशा आभासी जगातील आव्हानांकडे लवकर आकर्षित होतात.
------
विविध देशांतील लोकप्रिय परदेशी भाषांचा कल खालीलप्रमाणे आहे :
भारत :
इंग्रजी, कोरियन, फ्रेंच, जर्मन, जपानी

अमेरिका :
स्पॅनिश, फ्रेंच

चीन :
इंग्रजी, जपानी आणि कोरियन

जर्मनी :
इंग्रजी, फ्रेंच आणि स्पॅनिश

फ्रान्स :
इंग्रजी, स्पॅनिश आणि जर्मन

ब्रिटन :
फ्रेंच, स्पॅनिश आणि मंदारिन (चिनी)

दक्षिण कोरिया आणि जपान :
इंग्रजी, चिनी

-----
भाषा लोकप्रिय होण्याची प्रमुख कारणे ः
१. ज्या देशाची चित्रपट, गाणी आणि गेम्स लोकप्रिय होतात, त्या देशाची भाषा लोक आवडीने शिकतात. कोरियन, जपानी ही त्याची उदाहरणे आहेत.
२. ज्या देशात नोकरीच्या संधी जास्त आहेत, तिथली भाषा शिकली जाते (उदा. जर्मन, मंदारिन).
३. उच्च शिक्षणासाठी परदेशी विद्यापीठांची निवड करताना संबंधित देशाची भाषा शिकावी लागते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com