

भंगाराच्या नावाखाली ड्रग्ज रॅकेट
नवी मुंबईत अमली पदार्थविरोधी पथकाची कारवाई; सात जण अटकेत
नवी मुंबई, ता. १२ (वार्ताहर) : भंगारविक्रीच्या व्यवसायाचा आडोसा घेऊन अमली पदार्थांची विक्री करणाऱ्या एका टोळीचा नवी मुंबई अमली पदार्थविरोधी पथकाने पर्दाफाश केला आहे. अमली पदार्थविरोधी पथकाने नेरूळ रेल्वेपटरीलगत असलेल्या झोपडीवर धाड टाकून २२ लाख रुपये किमतीचा हेरॉइन आणि गांजा जप्त केला आहे. तसेच या तस्करीत सहभागी असलेल्या सात आरोपींना अटक केली आहे.
नेरूळ सेक्टर २८ मध्ये रेल्वेमार्गाजवळ भंगारविक्रीच्या नावाखाली राजू राठोड नावाचा व्यक्ती आपल्या नातेवाइकांच्या मदतीने अमली पदार्थ विकत असल्याची माहिती अमली पदार्थविरोधी कक्षाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संदीप निगडे यांच्या नेतृत्वाखाली चार पोलिस अधिकारी आणि १५ पोलिस अंमलदारांच्या पथकाने बुधवारी दुपारी १२.३०च्या सुमारास संशयित झोपडीवर छापा टाकला. या वेळी पोलिसांनी घेतलेल्या झाडाझडतीत या झोपडीत तब्बल २२ लाख रुपये किमतीचे ४३.६ ग्रॅम हेरॉइन तसेच २६ ग्रॅम गांजा आढळून आला. पोलिसांनी हा गांजा जप्त करून अमली पदार्थाच्या तस्करीत सहभागी असलेल्या राकेश सचिन वाघरी (१८), राजेंद्र भीमा काळे (५५), अनिता संजय पवार (२९), राजू बाबू राठोड (२८), शिवराम लक्ष्मण पवार (३२), कमळाबाई बाबू राठोड (५५), सुमन राजू राठोड (२५) या सात जणांना ताब्यात घेतले. त्यांच्यावर नेरुळ पोलिस ठाण्यात एनडीपीएस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
------
मुख्य आरोपी सराईत गुन्हेगार
अटकेत असलेला मुख्य आरोपी राजू राठोड हा सराईत गुन्हेगार असून, त्याच्यावर यापूर्वी नेरूळ पोलिस ठाण्यात मारहाण, चोरी, घरफोडी यांसारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत. आरोपी राजू राठोड याचे भंगार दुकान अनधिकृत जागेत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे हे अनधिकृत बांधकाम तातडीने निष्कासित करण्यासाठी पोलिस प्रशासनाने नवी मुंबई महापालिकेशी पत्रव्यवहार केला आहे. या प्रकरणातील अन्य दोन आरोपी विशाल आणि गंगा काळे या दोघांचा पोलिस शोध घेत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.