

‘शालार्थ’ घोटाळ्यात सव्वा कोटींचा डल्ला
वाशी पोलिसात २० जणांवर गुन्हे दाखल
नवी मुंबई, ता. १२ (वार्ताहर) : बनावट कागदपत्रांच्या आधारे शालार्थ आयडी मिळवून शासनाच्या तिजोरीवर तब्बल एक कोटी २४ लाख ६९ हजार रुपयांचा डल्ला मारण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणात वाशी पोलिसांनी अलिबाग, खोपोली येथील शिक्षक तसेच महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे तत्कालीन विभागीय अध्यक्षांसह २० जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
अलिबाग येथील जनता शिक्षण प्रसारक मंडळाचे पदाधिकारी व प्राचार्य तसेच सहाय्यक शिक्षक तसेच खोपोली तालुका शिक्षण प्रसारक मंडळ केएमसी या संस्थेचे पदाधिकारी, प्राचार्य व शिक्षक अशा १७ जणांनी संगनमत करून बनावट कागदपत्रांच्या आधारे अनधिकृतपणे शालार्थ आयडी प्राप्त केल्याचे आढळून आले. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वाशी येथील मुंबई विभागीय कार्यालयातील अधिकाऱ्यांना ही फसवणूक निदर्शनास आली.
विशेष म्हणजे, यातील आरोपी शेखर कुलकर्णी याने त्याची पत्नी गायत्री कुलकर्णी ही कोणत्याही पदावर कार्यरत नसताना, तसेच शासनाची कोणतीही मान्यता नसताना, ती डोंबिवली येथील सखाराम वामन जोशी (एस. व्ही. जोशी) या शाळेमध्ये सहशिक्षिका असल्याचे भासवून शासनाचे वेतन अनुदान लाटल्याचे उघडकीस आले आहे. या संपूर्ण गैरप्रकारात महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे तत्कालीन विभागीय अध्यक्ष नितीन उपासनी व इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मदत केल्याचे समोर आले आहे.
या सर्वांनी ऑगस्ट २०१८ ते आजपर्यंत बनावट कागदपत्रांच्या आधारे शालार्थ आयडी मिळवून शासनाच्या तिजोरीवर तब्बल एक कोटी २४ लाख ६९ हजार रुपयांचा डल्ला मारल्याचे उघडकीस आले. याप्रकरणी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे मुंबई विभागीय सचिव राजेंद्र आहेर वाशी पोलिस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केली होती. या तक्रारीवरून पोलिसांनी २० जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तसेच हा घोटाळा अजून किती मोठा आहे आणि यात आणखी कोणाचे हात गुंतले आहेत, याचा शोध पोलिस घेत आहेत.
---------
अधिकाऱ्यांसह शिक्षकांचा समावेश
या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांमध्ये अलिबाग येथील जनता शिक्षण प्रसारक मंडळाचे मानद चिटणीस मिलिंद पाटील, तत्कालीन प्राचार्य अनिल पाटील, विद्यमान प्राचार्य सोनाली पाटील, सहशिक्षिका मयूरी पाटील, सहशिक्षक जयेश पाटील, सहशिक्षक स्वप्नील राऊत, सहशिक्षक वैभव गोसावी, तसेच खोपोली तालुका शिक्षण प्रसारक मंडळ, केएमसी या संस्थेचे कार्यवाहक किशोर पाटील, कनिष्ठ महाविद्यालयाचे तत्कालीन प्राचार्य एन. वी. पवार, एन. रामास्वामी, डी. पी. हरिदास, एन. वी. खानविलकर, पी. जी. पाटील, विद्यमान प्राचार्य डी. पी. गायकवाड, सहशिक्षिका प्राची नलावडे, संचालक दिनेश गुरव, शेखर कुलकर्णी, गायत्री कुलकर्णी व तत्कालीन विभागीय अध्यक्ष नितीन उपासनी तसेच महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षणातील इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.