आमदार स्नेहा दुबे पंडित यांची महावितरणच्या सोबत आढावा बैठक

आमदार स्नेहा दुबे पंडित यांची महावितरणच्या सोबत आढावा बैठक

Published on

किनारपट्टी भागातील वीजवाहिन्या भूमिगत होणार
आढावा बैठकीत महावितरणच्या अधिकाऱ्यांची माहिती

विरार, ता. १४ (बातमीदार) : वसई विधानसभेच्या आमदार स्नेहा दुबे-पंडित यांच्या प्रमुख उपस्थितीत आमदार जनसंपर्क कार्यालय, वसई पश्चिम येथे शुक्रवारी (ता. १३) महावितरणच्या अधिकाऱ्यांसोबत महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीस महावितरणचे अधीक्षक अभियंता संजय खंदारे आणि इतर सर्व संबंधित अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत किनारपट्टी भागातील वीजवाहिन्या भूमिगत करण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
या बैठकीत वसई मंडळातील महावितरणकडून सुरू असलेल्या तसेच नजीकच्या कालावधीत हाती घेण्यात येणाऱ्या विविध कामांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. विशेषतः बंच कंडक्टरच्या सुरू असलेल्या कामांची प्रगती, तांत्रिक बाबी आणि नव्याने प्रस्तावित कामांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. वसईच्या किनारपट्टी भागातील ओव्हरहेड वीजवाहिन्या भूमिगत करण्याच्या कामाला कार्यादेश देण्यात आल्याची व पुढील काही दिवसांत हे काम सुरू करण्यात येत असल्याची माहितीही उपस्थित अधिकाऱ्यांनी दिली. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे वादळ, पावसाळा व इतर आपत्कालीन परिस्थितीत वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रमाण कमी होऊन नागरिकांना सुरक्षित व अखंडित वीजसेवा उपलब्ध होणार आहे. तसेच सफाळा येथे प्रस्तावित वीज उपकेंद्रासाठी निश्चित करण्यात आलेल्या जागेच्या हस्तांतरणाची प्रक्रिया सुरू असून, लवकरच उपकेंद्र उभारणीच्या कामास सुरुवात होणार असल्याचेही सांगण्यात आले. या उपकेंद्रामुळे परिसरातील वाढत्या वीज मागणीची पूर्तता होऊन भारनियमनाचा प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे. वीजबिल तक्रार निवारण केंद्र सनसिटी येथे स्थलांतरित करण्यात येत असले, तरी सध्याच्या ठिकाणीही व्यवस्था कायम ठेवण्यात येणार आहे. तेथे कायमस्वरूपी तीन अधिकारी कार्यरत राहणार असल्याचे अधीक्षक अभियंता संजय खंदारे यांनी स्पष्ट केले. त्यामुळे नागरिकांना वीज देयकांबाबत कोणतीही अडचण निर्माण होणार नसल्याचे आश्वासनही देण्यात आले. या वेळी आमदार स्नेहा दुबे-पंडित यांनी वसईतील नागरिकांना अखंडित व सुरक्षित वीजपुरवठा मिळावा यासाठी प्रशासनाने कामांची गती वाढवावी, अशा सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com