उद्योग सुरू न झाल्यास भूखंड परत घेणार

उद्योग सुरू न झाल्यास भूखंड परत घेणार

Published on

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १४ : जिल्ह्यातील विविध शहरांमध्ये औद्योगिक विकासाला चालना देण्यासाठी आणि उद्योग वाढीस प्रोत्साहन मिळावे, या उद्देशाने महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या माध्यमातून लीज पद्धतीवर भूखंड देण्यात आले होते. मात्र, अनेक वर्षांपासून काही औद्योगिक भूखंडांवरील सुमारे १२५ कारखाने सध्या बंद अवस्थेत असल्याचे निदर्शनास आले. या उद्योगांना पुन्हा कारखाने सुरू करण्याच्या नोटिसा देण्यात आल्या. तसेच दिलेल्या मुदतीत उद्योग सुरू न झाल्यास संबंधित भूखंड परत घेण्याची प्रक्रिया राबविण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी)मार्फत राज्यातील औद्योगिक विकासाला चालना देण्यासाठी विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. राज्यात उद्योगवाढीस प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने स्थापन करण्यात आलेल्या महामंडळामुळे अनेक वर्षांपासून मोठ्या प्रमाणात गुंतवणूक झाली आहे. रोजगारनिर्मितीसही चालना मिळाली आहे. महामंडळाच्या ठाणे १ प्रादेशिक कार्यालयाच्या अधिपत्याखाली मरोळ, मिरा रोड, ठाणे, डोंबिवली, तारापूर आदी जुनी औद्योगिक क्षेत्रे येतात. या औद्योगिक क्षेत्रांमध्ये मोठ्या प्रमाणात औद्योगिकीकरण झालेले असून नव्या उद्योगांसाठीही सातत्याने मागणी होत आहे. असे असताना, दुसरीकडे काही औद्योगिक भूखंडांवरील कारखाने सध्या बंद अवस्थेत असल्याचे निदर्शनास आले. या पार्श्वभूमीवर ज्या भूखंडधारकांचे उद्योग बंद आहेत अशा सुमारे १२५ उद्योजकांना उद्योग (पुनर्जीवित) पुन्हा सुरू करण्याबाबत नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. संबंधित उद्योजकांनी निश्चित कालावधीत आपला उद्योग पुन्हा सुरू करावा, यासाठी ही कार्यवाही करण्यात आली आहे.

रोजगारनिर्मितीचा उद्देश
महामंडळाच्या नियमानुसार, दिलेल्या मुदतीत बंद कारखाने व उद्योग व्यवसाय सुरू न झाल्यास संबंधित भूखंड परत घेण्याची प्रक्रिया राबविण्यात येणार असल्याची माहिती महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ विभागाने दिली. बंद उद्योग पुन्हा सुरू होऊन रोजगारनिर्मितीस चालना मिळावी; तसेच नव्या उद्योजकांना संधी उपलब्ध व्हावी, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश असल्याचे महामंडळाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com