सोनसाखळी चोरणाऱ्या चौघांना अटक
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १४ : सोनसाखळी आणि मोबाईल चोरी करणाऱ्या; तसेच पोलिस असल्याची बतावणी करून हातचलाखीने दागिने लंपास करणाऱ्या चौघांना अटक करण्यात भिवंडी गुन्हे शाखेला यश आले आहे. या कारवाईत ११ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून १८ गुन्हे उघडकीस आणले आहेत. ही माहिती पोलिस उपायुक्त अमरसिंह जाधव यांनी शुक्रवारी ठाणे येथे झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.
ठाणे शहर पोलिस आयुक्तालय हद्दीत वाढलेल्या सोनसाखळी, मोबाईल चोरी व पोलिस बतावणीच्या गुन्ह्यांचा छडा लावण्याचे आदेश वरिष्ठांकडून देण्यात आले होते. त्यानुसार वरिष्ठ पोलिस निरीक्षक शीतल राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने गुप्त माहिती व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे रवींद्र धनाजी भोसले (वय २४) याला कल्याण-भिवंडी बायपास येथे सापळा रचून अटक केली. चौकशीत भोसले याने भिवंडी, कल्याण, ठाणे, उल्हासनगर, कर्जत रेल्वे व पुणे रेल्वे हद्दीत १३ सोनसाखळी व तीन मोबाईल चोरी असे एकूण १६ गुन्हे केल्याची कबुली दिली. चोरीचा माल त्याने कल्याण-आंबिवली येथील दिनेश पाटील (वय ४७) याला विक्रीसाठी दिल्याचे सांगितले. त्यानुसार दोघांना अटक करून १५ तोळे सहा ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने (किंमत सुमारे ५ लाख ६१ हजार रुपये) आणि २१ मोबाईल असा एकूण आठ लाख ५५ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
दरम्यान, पोलिस असल्याची बतावणी करून नागरिकांना फसवणाऱ्या मोहम्मद अजीज जाफरी (रा. पुणे) यालाही संशयावरून ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्याने भिवंडी शहरात गुन्हे केल्याची कबुली दिली. संबंधित मुद्देमाल त्याने कर्नाटकातील श्रीकांत गबाळे याला विकल्याचे उघड झाले. त्या दोघांना अटक करून ४५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने (दोन लाख २० हजार रुपये) जप्त करण्यात आले. या कारवाईमुळे ठाणे शहर पोलिस आयुक्तालय हद्दीतील एकूण १८ गुन्हे उघडकीस आले असून पुढील तपास सुरू आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

