नोकरदारांची मुस्कटदाबी

नोकरदारांची मुस्कटदाबी

Published on

नोकरदारांची मुस्कटदाबी
डहाणू, वैतरणा मार्गावर अपुरी लोकल सेवा, रेल्वे प्रशासनाचे दुर्लक्ष
पालघर, ता. १४ ः पश्चिम उपनगरीय रेल्वेवर प्रवासीवर्गाची वाढती गर्दी लक्षात घेता, रेल्वे प्रशासनाने १२ अतिरिक्त वातानुकूलित लोकल, तीन बिगर वातानुकूलित लोकल १९ फेब्रुवारीपासून चालवण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, याच उपनगरीय रेल्वेसेवेचा भाग असलेला वैतरणा ते डहाणू रेल्वे पट्ट्यात अजूनही लोकलसेवा वाढवण्याचा विचार पश्चिम रेल्वेने केला नसल्याने नोकरदावर्गाची मुस्कटदाबी सुरू असल्याचे चित्र आहे.
पालघर जिल्ह्याची चौथ्या मुंबईकडे वाटचाल सुरू आहे. मर्यादित लोकल सेवांमुळे परिणाम जाणवत आहे. डहाणू-वैतरणा भागातील नोकरदारवर्ग मोठ्या प्रमाणात मुंबईकडे शासकीय, निमशासकीय, खासगी नोकरीसाठी जातो. तर तारापूर औद्योगिक वसाहत, जिल्हा मुख्यालय, डहाणू औष्णिक विद्युत प्रकल्प येथेही मुंबईकडून येणाऱ्या नोकरदारांची संख्या लक्षणीय आहे. अलीकडील काळात रेल्वे प्रवासीवर्गात मोठी वाढ झाल्याने प्रवासीवर्गाला प्रचंड गर्दीचा सामना करावा लागत आहे. कामांच्या वेळांमधील लोकलमधील गर्दी डोकेदुखी ठरू लागली आहे. मुंबईत मात्र लोकल सेवा वाढवण्यात आल्या आहेत. वैतरणा-डहाणू भागासाठी लोकल सेवा वाढवली नसल्याने वाढत्या गर्दीमुळे दररोजचा प्रवास जीवघेणा ठरत आहे.
--------------------------
- वैतरणा ते डहाणू मार्गावर सकाळ-संध्याकाळ प्रचंड गर्दी असते. विरारनंतर गाड्यांची संख्या कमी असल्याने वैतरणा, सफाळे, केळवे रोड, पालघर, बोईसर ते डहाणू रोडपर्यंत महिला, ज्येष्ठ नागरिकांना तसेच विद्यार्थ्यांना अक्षरशः दरवाजात लटकून प्रवास करावा लागतो.
- मुंबई शहर व मध्यवर्ती उपनगरांमध्ये मार्ग उपलब्ध करून लोकल फेऱ्या वाढवल्या जातात. वैतरणा-डहाणू पट्ट्यासाठी मार्ग उपलब्ध नसल्याचे कारण रेल्वे प्रशासन देते. मुंबईत मार्ग मिळतो, मग आमच्यासाठी का मिळत नाही, असा सवाल प्रवासी उपस्थित करीत आहेत.
------------------------------
गर्दी अपघातांना निमित्त
स्थानिक खासदार डॉ. हेमंत सावरा, डहाणू वैतरणा प्रवासी सेवाभावी रेल्वे संघटनांनी वारंवार या प्रश्नावर पाठपुरावा केला आहे. लोकल फेऱ्या वाढवाव्यात, सकाळ-संध्याकाळ विशेष गाड्या चालवाव्यात तसेच काही विरार लोकल्स डहाणूपर्यंत वाढवाव्यात, यासाठी त्यांनी रेल्वे प्रशासनाला अनेक पत्रे दिली आहेत. मात्र त्यांच्या पत्रांना केराची टोपली दाखवली जात आहे. त्यामुळे वाढणारी गर्दी अपघातांना निमित्त ठरत आहे.
--------------------------
असलेली लोकल सेवा
लोकल - २१ अप २१ डाऊन
शटल/पॅसेंजर - ६ अप ६ डाऊन
मेमू - ६ अप ६ डाऊन
एकूण - ३३ अप ३३ डाऊन

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com